'आय क्लीन अमरावती'च्या वारली पेंटिंगची ऐसीतैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:03 IST2018-09-16T22:02:34+5:302018-09-16T22:03:17+5:30
'आय क्लीन अमरावती' च्या उपक्रमाला गालबोट व हरताळ फासण्याचे प्रकार सद्यस्थितीत शहरात सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नवाथे नगरातील भूमिगत मार्गाच्या भिंतींवर एका राजकीय नेत्याच्या कार्यक्रमांचे पोस्टर लावण्यात आले होते, तर आता शिवाजी विज्ञान महाविद्यालय व गर्ल हायस्कूलसमोरील भिंतींवरील वारली पेटिंगची ऐसीतैसी करण्यात आली.

'आय क्लीन अमरावती'च्या वारली पेंटिंगची ऐसीतैसी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'आय क्लीन अमरावती' च्या उपक्रमाला गालबोट व हरताळ फासण्याचे प्रकार सद्यस्थितीत शहरात सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नवाथे नगरातील भूमिगत मार्गाच्या भिंतींवर एका राजकीय नेत्याच्या कार्यक्रमांचे पोस्टर लावण्यात आले होते, तर आता शिवाजी विज्ञान महाविद्यालय व गर्ल हायस्कूलसमोरील भिंतींवरील वारली पेटिंगची ऐसीतैसी करण्यात आली. अमरावतीला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांचे परिश्रम निष्फळ ठरत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी झपाटलेल्या काही तरुणांनी आय क्लिन अमरावती उपक्रम राबवून भिंतींवर वारली पेंटिंग काढून संदेश दिला. शहरातील शासकीय परिसरातील भिंतींवर वारली पेंटींगच्या माध्यमातून आय क्लिन अमरावतीचा संदेश दिला. तो संदेश वाचून आजपर्यंत कोणीही त्या भिंतींवर थुंकण्याची किंवा पोस्टर लावण्याचे धाडसही केले नाही. त्यामुळे या उपक्रमाला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाले. तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक जिल्हा प्रशासनानेही केले. महापालिकेनेही पुढाकार घेत आय क्लिन अमरावती उपक्रमाला सहकार्य केले. त्यामुळे तरुणांचा उत्साह वाढला होता. त्यांनी शहरातील बहुंताश भिंतींवर वारली पेंटिंग काढून आय क्लिन अमरावतीचा संदेश दिला. मात्र, नुकतेच नवाथे नगरातील रेल्वे क्रॉसिंगचा अंडरपाथवरील भिंंतीवर एका राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाचे पोस्टर लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता या भिंती पुन्हा अस्वच्छ व विद्रुप दिसायला लागल्या आहेत. यांची खंत उपक्रम राबविणाऱ्यांनी तरुणांमध्ये व्यक्त होत आहे. यासंदर्भात ते तरुण महापालिका प्रशासनाकडे दाद मागणार आहे.
महापालिका लक्ष देईल का ?
महापालिका हद्दीत राबविण्यात आलेला आय क्लिन अमरावती या उपक्रमाची प्रशंसा महापालिका आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी केली होती. भिंतीवरील वारली पेंटींगचे संदेश अमरावतीकरांना नेहमीच स्वच्छतेविषयक आठवण करून देणारे आहे. मात्र, त्याच संदेशांना नाहीसा करण्याचे प्रयत्न आता शहरात सुरू झाले आहे. असेच होत राहिले, तर स्वच्छ व सुंदर अमरावतीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, याचीच चिंता उपक्रमात सहभागी तरुणांना सतावत आहे.