१४ मार्चला बाटली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:18 IST2018-03-10T22:18:21+5:302018-03-10T22:18:21+5:30
शहरातील सती चौक परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता गतवर्षी आंदोलन उभारले होते. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत वेळोवेळी महिलांनी दादही मागितली.

१४ मार्चला बाटली आडवी
आॅनलाईन लोकमत
वरूड : शहरातील सती चौक परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता गतवर्षी आंदोलन उभारले होते. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत वेळोवेळी महिलांनी दादही मागितली. परंतु, न्याय न मिळाल्याने याप्रकरणी अखेर १४ मार्चला मतदान होत आहे. वरूड शहर दारूमुक्त करण्याचा निर्धार आ. अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे यांनी महिलादिनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून सती चौक परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करावे, यासाठी वसुधा बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी आंदोलन केले. दुकानाला स्वत: नगराध्यक्ष स्वाती आंडे यांनी कुलूप ठोकले होते. याप्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून प्रशासनाने महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यांनी नव्या जोमाने आंदोलन सुरू ठेवून जिल्हाधिकाºयांकडे ६०० स्वाक्षºयांची तक्रार दाखल केली. त्यामुळे प्रशासनाने १४ मार्चला न्यू इंग्लिश मिडल स्कूलमध्ये सकाळी ८ ते ५ पर्यंत मतदान जाहीर केले आहे. डॉ. वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे तसेच नगरसेविकांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.नगर परिषदेने शहर दारूमुक्तीचा ठराव घेतला असून, नारीशक्ती एकवटल्याने बाटली आडवीच राहणार, असा विश्वास वसुधा बोंडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महिला-बाल कल्याण सभापती पुष्पा धकिते, नगरसेविका नलिनी रक्षे, रेखा काळे, भारती माळोदे, सुवर्णा तुमराम, शुभांगी खासबागे, मंदा आगरकर, अर्चना आजनकर, छाया दुर्गे, राजू सुपले, युवराज आंडे, प्रीतम अब्रुक, माधुरी भगत, संगीता भगत, शोभा तरुडकर, वंदना मोहाडे, सीमा साखरकर, विमल तायवाडे, छाया तायवाडे, रोशनी रेवडे, रेखा बावणे, मंदा सुरजुसे, आशा सुरजुसे शेकडो महिला उपस्थित होत्या.