राणांच्या ‘गंगा सावित्री’वर होमहवन, गोमूत्र शिंपडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 15:26 IST2022-04-25T14:55:39+5:302022-04-25T15:26:01+5:30
यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, विचार विसरलेल्या शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

राणांच्या ‘गंगा सावित्री’वर होमहवन, गोमूत्र शिंपडले
अमरावती : आमदार रवी राणा यांच्या ‘गंगा सावित्री’ या निवासस्थानी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी होमहमन केले आणि गोमूत्र शिंपडून अपवित्र झालेला परिसर पवित्र करण्याचा अनाेखा उपक्रम राबविला. या वेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, विचार विसरलेल्या शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्या अनुपस्थितीत शनिवारी शिवसैनिकांनी आमदार राणांचे आई-वडील, लहान मुलांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. घरावर दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदू संस्कृती विसरले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण न अंगीकारता आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने दडपशाही करून हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना जेलची वारी करायला लावत आहेत, असा आरोप करण्यात आला.
या बाबींमुळे शिवसैनिक स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण विसरल्याचे सिद्ध झाल्याने दिवंगत बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभावी व वाट चुकलेल्या या तथाकथित शिवसैनिकांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होमहवन केले. स्थानिक शिवसैनिकांनी केलेल्या अर्वाच्य शिवीगाळ आणि धर्मविरोधी वागणुकीने अपवित्र झाल्याचे म्हणत सर्व परिसर गोमूत्र शिंपडून पवित्र करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थित होते.