अमरावती : होम आयसोलेशनमधील एका रुग्णाला घराबाहेर मुक्त संचार करणे चांगलेच महागात पडले. महापालिका पथकाच्या निदर्शनात हा प्रकार आल्यानंतर त्यांना २५ हजारांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली व या रुग्णाविरुद्ध राजापेठ ठाण्यात गुन्हाही दखल करण्यात आलेला आहे.
महापालिकेचे पथक होम आयसोलेशनमधील रुग्णांची बुधवारी नियमित तपासणी करत असतांना शंकर नगरातील एक रुग्ण घराबाहेर असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे पथकाद्वारा त्या रुग्णाचे घराला २५ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस चिपकवण्यात आली. हा रुग्ण २७ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णांनी होमआयसोलेशन संदर्भातील बंधपत्र भरून दिले होते. त्यामुळे या रुग्णांने घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक असताना त्याने नियमाचे उल्लंघन केल्याची बाब पथकातील कर्मचारी नीलेश सोळंके व पोलीस कॉस्टेबल नीलेश बन यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी या रुग्णाला २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली. होमआयसोलेशनचे नोडल ऑफिसर डॉ. सचिन बोंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आपत्ती कायद्यान्वये भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी गुरुवारी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
बॉक्स
आतापर्यंत १५ रुग्णांना ४.२५ लाखांचा दंड
महापालिका क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यांपासून होमआयसोलेशनमधील १५ रुग्णांवर प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे ४.२५ लाखांच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तपोवन, रविनगर, जय कॉलनी, हमालपुरा, न्यू कॉलनी, राजापेठ, रविनगर, हार्दिक कॅालनी, राधानगर, म्हाडा कॉलनी, शोभानगर, कंवर नगर नरेडीनगर, किरण नगर व शंकर नगर येथील रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांद्वारा दंडाचा भरणा न करण्यात आल्यास ही रक्कम त्याच्या मालमत्ता करात जमा केल्या जाणार आहे.