गूगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:28 IST2019-03-09T22:27:42+5:302019-03-09T22:28:07+5:30
तिवसा नगरपंचायतीतर्फे शहरातील मालमत्तांचे जीआयएस (जिओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) सर्वेक्षण केले जाणार आहे. करनिर्धारणासाठी आवश्यक असलेल्या या सर्वेक्षणास शुक्रवारी प्रारंभ झाला. ड्रोन कॅमेराने हे सर्वेक्षण होणार असून, त्याद्वारे गुगल मॅपवर घरांचे लोकेशन पाहावयास मिळणार आहे. शुक्रवारी दुपारी तिवसा पोलीस ठाण्यासमोर आमदार यशोमती ठाकूर व नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी ड्रोन कॅमेऱ्याची कळ दाबून या योजनेची सुरुवात केली.

गूगल मॅपवर मिळेल घरांचे लोकेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तिवसा नगरपंचायतीतर्फे शहरातील मालमत्तांचे जीआयएस (जिओग्रॉफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) सर्वेक्षण केले जाणार आहे. करनिर्धारणासाठी आवश्यक असलेल्या या सर्वेक्षणास शुक्रवारी प्रारंभ झाला. ड्रोन कॅमेराने हे सर्वेक्षण होणार असून, त्याद्वारे गुगल मॅपवर घरांचे लोकेशन पाहावयास मिळणार आहे. शुक्रवारी दुपारी तिवसा पोलीस ठाण्यासमोर आमदार यशोमती ठाकूर व नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी ड्रोन कॅमेऱ्याची कळ दाबून या योजनेची सुरुवात केली.
सर्वेक्षणाचे कंत्राट नाशिक येथील एजंसीला देण्यात आले. या कंपनीने शहरात ४० कर्मचारी नेमले आहेत. मालमत्तांचे सर्वेक्षणासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यात शहरातील सर्वंच मालमत्तांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करनिर्धारणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांचे लोकेशन गुगल मॅपवर टाकले जाणार आहे. संबंधित घराच्या तीन बाजूचे चित्र टाकले जाणार असल्याने सदर घर ओळखण्यासही मदत होणार आहे. तिवसा पोलीस ठाण्यासमोर याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मुख्याधिकारी सचिन गाडे, विरोधी पक्षनेते प्रदीप गौरखेडे, उपाध्यक्ष संध्या मुंदाने, भूषण यावले, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, नरेंद्र विघ्ने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
पहिल्यांदाच सर्वेक्षण
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरातील निवासी व वाणिज्यिक मालमत्तांचे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणाअंती संपूर्ण डेटाबेस एका सॉफ्टवेअरमध्ये संकलित करून नगरपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर नव्याने करनिर्धारण केले जाईल. करनिर्धारण झाल्यानंतर नगरपंचायतीच्या महसुली उत्पन्नात भरघोस वाढ अपेक्षित आहे.