अमरावतीचा प्रसिद्ध 'गिला वडा'; कोठून आला, कसा फेमस झाला.. जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 15:08 IST2022-01-30T15:01:59+5:302022-01-30T15:08:44+5:30
मुळात बुंदेलखंडी असलेला हा गिला वडा अमरावतीत आला कसा अन् त्याने अमरावतीकरांना लळा लावला कसा, हे सांगणारी गिलावडाची गोष्ट त्याच्या चवीइतकीच न्यारी आहे.

अमरावतीचा प्रसिद्ध 'गिला वडा'; कोठून आला, कसा फेमस झाला.. जाणून घ्या
अमरावती : अंबानगरीत येणाऱ्या पाहुण्याला आवर्जून सांगितले जाते, अमरावतीला जात आहात ना? मग गिलावडा अवश्य खाल. होय, महाराष्ट्राची ओळख सांगणारे अनेक पदार्थ असतील; पण अमरावतीचा गिला वडा म्हणजे लय भारी.
इतर पदार्थाची एक स्वतंत्र रेसिपी आहे, त्या मागील पाश्वभूमी आहे. गिलावडाही तशाच आहे. मुळात बुंदेलखंडी असलेला हा गिला वडा अमरावतीत आला कसा अन् त्याने अमरावतीकरांना लळा लावला कसा, हे सांगणारी गिलावडाची गोष्ट त्याच्या चवीइतकीच न्यारी आहे.
अमरावती जिल्हा वगळता महाराष्ट्रात इतर कुठेही तो मिळत नसल्याचा दावा येथील व्यावसायिक मोठ्या अभिमानाने करतात. व्हाया बुंदेलखंड ते अमरावती असा या गिला वडाचा प्रवास. १९६० च्या दशकात हा अमरावतीत पोहोचला तो बुंदेलखंडवासीयांसोबत. गोविंद पारिछत साहू सांगतात, सुमारे २५ हजाराहून अधिक लोकं बंदेलखंडहून अमरावतीत स्थायिक झाले. सुरुवातीला लग्न समारंभात भोजनाचा मेन्यू असलेला गिला वडा पुढे अमरावतीची ओळख झाला. लग्न समारंभाच्या वेळी कुलदैवतांना बुंदेलखंडवासी गिला वड्याचा नैवेद्य द्यायचे. नंतर ८० च्या दशकात काहींनी याचा व्यवसाय सुरू केला तो आज लाखोंच्या घरात पोहोचला आहे. उळद दाळीपासून तयार होणारा हा पदार्थ पाचक तर आहेच, शिवाय हेल्दीही आहे.
असे आहे अर्थकारण
सकाळी आठवाजतापासून तर रात्री आठवाजेपर्यंत शहरात अनेक ठिकाणी सहज उपल्बध होणाऱ्या या पदार्थाची दररोजची उलाढाल ५० हजार रुपयांहून अधिक आहे. मसानगंज परिसरातून दररोज जवळपास ३० गाड्या निघतात आणि दिवसाला किमान एक हजार प्लेटची विक्री होत असल्याने गिला वड्याने आपली चव राखून ठेवली आहे. त्यावर दिली जाणाऱ्या चटण्या हे त्याचे खास वैशिष्ट्य.