त्याची संगीत क्षेत्रातील कामगिरी ‘डोळस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:06 IST2018-12-09T01:05:51+5:302018-12-09T01:06:45+5:30
जिद्द, चिकाटी व त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल, तर या जगात काहीही साध्य करता येते, असा ठाम विश्वास बाळगून साहिल गजानन पांढरे या दृष्टिहीन विद्यार्थ्याने संगीत क्षेत्रात आगळी ओळख निर्माण करीत नेत्रदीपक यश संपादन केले.

त्याची संगीत क्षेत्रातील कामगिरी ‘डोळस’
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिद्द, चिकाटी व त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल, तर या जगात काहीही साध्य करता येते, असा ठाम विश्वास बाळगून साहिल गजानन पांढरे या दृष्टिहीन विद्यार्थ्याने संगीत क्षेत्रात आगळी ओळख निर्माण करीत नेत्रदीपक यश संपादन केले.
साहिलने एका वाहिनीवरील कार्यक्रमात तीन महिने महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येतील संगीत रसिकांना त्याच्या मुखातून निघणाऱ्या बहारदार गीतांनी मंत्रमुग्ध केले. तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका ठरला. तेथे मिळालेली संधी व अनुभवातून खूप काही शिकता आल्याचे समाधान व्यक्त करीत यानंतरही आपण संगीत क्षेत्रातील जिद्द सोडणार नाही. पुढे संधी मिळाल्यास त्याचे सोनं करूच, असा विश्वास त्याने शनिवारी 'लोकमत'शी गप्पांदरम्यान व्यक्त केला. पुलगाव तालुक्यातील विरुळ आकाजी या लहानशा गावात साहिलचा जन्म झाला. वडील गजानन पांढरे हे गवंडीकाम करतात. आई शेतमजुरी करते. मोठा भाऊ अकरावीवीत शिकतोय. जन्मत:च दृष्टिहीन असलेल्या साहिलला गावातील भजन मंडळीत जाण्याची आवड होती. येथूनच त्याला संगीताची आवड निर्माण झाली. शिक्षणासाठी पहिल्या वर्गात अमरावती येथील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात दाखल झाला. आता तोे १४ वर्षांचा असून, इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. इयत्ता सातवीत त्याला ७० टक्के गुण मिळाले. संगीत शिक्षक सोपान रत्नपारखी यांनी त्याच्यातील गायनाचा गुण नेमका हेरला. मुख्याध्यापक नवनाथ इंगोले यांच्यासोबत आपण नागपूरला आॅडिशनसाठी गेलो. त्याच ठिाकाणी सिलेक्ट झालो. मी यावेळी ‘मन हा मोगरा’ अभंग गायिले. गझल सम्राट भीमराव पांचाळे यांची 'अंदाज आरशाचा' ही गझल सादर केली. सुरेश वाडकरांची 'विठ्ठल आवळी' हा अभंग गायिला. पुढे संगीत क्षेत्रातच करियर करायचे असून, उस्ताद रशीद खान साहेब हे संगीत क्षेत्रातील आदर्शस्थानी असल्याचा उल्लेखही त्याने केला.
रत्नपारखी सरांकडून संगीताचे धडे
मला संगीत शिक्षक सोपान रत्नपारखी यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. अलंकार, वेगवेगळे राग त्यांनी शिकविले. मी अभंगासह क्लासिकलचेही प्रशिक्षण त्यांच्याकडून घेतले, असा उल्लेख साहिल याने केला.