पिंपरी यादगिरे येथे इसमाची हत्या
By Admin | Updated: August 28, 2015 00:40 IST2015-08-28T00:40:54+5:302015-08-28T00:40:54+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी यादगिरे येथील ४० वर्षीय इसमावर तिघांनी हल्ला करून त्याला ठार केले.

पिंपरी यादगिरे येथे इसमाची हत्या
गुन्हा दाखल : तिघांनी केली मारहाण
बडनेरा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी यादगिरे येथील ४० वर्षीय इसमावर तिघांनी हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना बुधवार २६ आॅगस्टला रात्री १० वाजता घडली.
पंकज लक्ष्मण वाघमारे (२५), सतीश सुभाष वाघमारे (२९) व श्रावण पुंडलिकराव झोंबाडे (२५,सर्व रा. पिंपरी यादगिरे) अशी आरोपींची नावे आहेत. विस्तृत माहितीनुसार, मृत दुर्योधन यादवराव बोरकर याचा २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घराजवळ कचरा टाकण्यावरून वाद झाला होता. याबाबतची तक्रार लक्ष्मण वाघमारे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर मात्र लक्ष्मण वाघमारे व त्याच्या दोन साथीदारांनी दुर्योधन बोरकर याच्यावर त्याच दिवशी रात्री १० वाजता हल्ला केला.
पिंंपरी येथील सातपुते यांच्या शेतात आरोपींनी दुर्योधन बोरकर याच्यावर हल्ला केला. बडनेरा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, उपनिरीक्षक प्राजक्ता धावडे, डीबीचे नंदकिशोर देशमुख, सुनील सोळंके, संदीप देशमुख व कावरे रूपनारायण यांनी आरोपींना उशिरा रात्री ताब्यात घेतले. पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)