महामार्गावरील होर्डिंग धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:31+5:30
महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महामार्गावरील होर्डिंग धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महामार्गावरील पंचवटी चौक ते रहाटगाव दरम्यान चौक अनधिकृत फलकांनी बुजले आहेत. त्यामुळे नगरातून महामार्गावर येणाºया नागरिकांना महामार्गावरील वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या बेकायदेशीर फलकांची दखल आयुक्त घेणार काय, असा नागरिकांचा सवाल आहे.
शहर सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण करणाऱ्या या चमकोबाजांवर महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाची ‘कृपा’ असल्याने चौकाचौकांचे विद्रुपीकरण झालेले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या या होर्डिंगबाबत कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या बाजार व परवाना विभागावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
वाढदिवस, स्वागत, शुभेच्छा, विकास कामाचे भूमिपूजन, याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारे अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे आहे. मात्र, अर्जुनगर चौकात या राजकीय व्यक्तींनीच अनधिकृत फलक लावले आहे. चौकाचे हे विद्रुपीकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. बाजार व परवाना विभागाचे दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.
दंड व शिक्षेची तरतूद - कारवाई केव्हा?
बाजार परवाना विभागाद्वारे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही प्रकारची शिक्षा अश्ी तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभाग कारवाई करीत नसल्यामुळे चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुद्द अनेक नगरसेवकांचीच फलके चौकांमध्ये अनधिकृतपणे लावलेली आहेत. आयुक्तांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.