अंशकालीन निदेशकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By Admin | Updated: June 16, 2014 23:16 IST2014-06-16T23:16:34+5:302014-06-16T23:16:34+5:30

अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीबाबत त्वरित कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून या निर्णयामुळे अंशकालीन निदेशकांना दिलासा मिळाला आहे.

High court relief for part-time directors | अंशकालीन निदेशकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

अंशकालीन निदेशकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

अमरावती : अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीबाबत त्वरित कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून या निर्णयामुळे अंशकालीन निदेशकांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने शैक्षणिक सत्र २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात ८५७७ अंशकालीन निदेशकांच्या नियुक्त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये केल्या होत्या. परंतु शैक्षणिक सत्र २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अंशकालीन निदेशकांना शासनाने नियुक्तीपासून वंचित ठेवले. या अनुषंगाने बालाजी किसन आडे व अन्य १२६ अंशकालीन निदेशकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अंशकालीन निदेशकांच्या नियमित नियुक्त्या होण्याबाबत याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे व न्या. व्ही.के. जाधव यांनी अंशकालीन निदेशकांच्या येत्या शैक्षणिक सत्रापासून नियमित नियुक्त्या करण्याबाबत शासनास आपल्या निकालपत्रात निर्देशित केले आहे. या अनुषंगाने विदर्भ कला शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस महेशचंद्र राजगिरे या शैक्षणिक सत्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये आरटीई अ‍ॅक्टनुसार अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीबाबत त्वरित अंमलबजावणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक व शालेय शिक्षण सचिव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे विनंती केली आहे. या निवेदनामध्ये बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे निदेशक नियुक्तीबाबतची १०० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची अट शिथिल करण्यात यावी, नियुक्त अंशकालीन निदेशकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अंशकालीन निदेशकांच्या नियुक्त्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.), मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी (मनपा) यांच्या मार्फतच व्हाव्यात, शाळा समितीचे नियुक्तीबाबतचे अधिकार गोठविण्यात यावे, ज्या अंशकालीन निदेशकांनी शैक्षणिक सत्र २०१२-१३ या वर्षात कामकाज केले आहे त्यांना यापुढे नियुक्ती देताना प्राधान्यक्रम देण्यात यावा आदी मुद्यांचा या निवेदनामध्ये समावेश केलेला आहे.
अंशकालीन निदेशकांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिल्यामुळे न्यायमूर्तींचे संघटनेचे अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस महेशचंद्र राजगिरे, विभागीय कार्यवाह गणेश भुतडा, कोषाध्यक्ष श्रीकांत चौथे, उपाध्यक्ष प्रशांत नवघरे, जिल्हाध्यक्ष एस.आर. पाटील, कोषाध्यक्ष विलास शिरसाट, अनिल लांडे, संजय ढाकुलकर, शिवशंकर बाजारे, एजाज अहमद आदींनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: High court relief for part-time directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.