दमदार पाऊस, नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST2021-07-12T05:00:00+5:302021-07-12T05:00:45+5:30
२४ तासांत भातकुली तालुक्यात ८४.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी २.३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात आलेला आहे. चिखलदरा तालुक्यात ६ मिमी, अमरावती १४.४, नांदगाव खंडेश्वर २६.४, चांदूर रेल्वे १४.७, तिवसा १३.७, मोर्शी १७.१, वरुड २४.७, दर्यापूर ४८.६, अंजनगाव सुर्जी ४८.१, अचलपूर २१.७, चांदूर बाजार २२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २२.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

दमदार पाऊस, नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहा दिवसांच्या ब्रेकनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. ८८ मंडळांपैकी नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भातकुली, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात पावसाने नदी-नाल्यांना पूर आला व पिकांसह काही घरांचे नुकसान झाले. काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले. शिवाय माती खरडून गेल्याने पिकांचेही नुकसान झाले.
जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत २३२.६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २६०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ११२.१ आहे. २४ तासांत भातकुली तालुक्यात ८४.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी २.३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात आलेला आहे. चिखलदरा तालुक्यात ६ मिमी, अमरावती १४.४, नांदगाव खंडेश्वर २६.४, चांदूर रेल्वे १४.७, तिवसा १३.७, मोर्शी १७.१, वरुड २४.७, दर्यापूर ४८.६, अंजनगाव सुर्जी ४८.१, अचलपूर २१.७, चांदूर बाजार २२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २२.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. विदर्भाचे नंदनवन मेळघाट यंदा पावसात माघारले. धारणी तालुक्यात १४१.४ व चिखलदरा तालुक्यात २२३.७ मिमी पावसाची नोंद झाली.
या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी
जिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार, भातकुली तालुक्यात भातकुली, पूर्णानगर, आष्टी, निंबा, आसरा, खोलापूर, वरूड तालुक्यात पुसला, दर्यापूर तालुक्यात येवदा व अंजनगाव सुर्जी तालुक्यात येवदा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. याशिवाय दर्यापूर, वडनेर गंगाई, कापूसतळणी, धानोरा, माहुली या मंडळांमध्येही ५० ते ६२ मिमी दरम्यान पावसाची नोंद झालेली आहे. रविवार हा सार्वजनिक सुटी असल्याने प्राथमिक अहवाल तयार केला नाही.
भंडारजला घरावर पडली वीज
अंजनगाव तालुक्यातील भंडारज येथे श्रीधर माधव गिते यांच्या घरावर शनिवारी रात्री वीज पडल्याने घराची भिंत पडली. उपकरणे जळाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जामनी, खिरसाना, निरसाना येथे रात्रीच्या पावसाने घरांच्या भिंती पडल्या व जामनी येथील एक आंब्याचे झाड उन्मळून पडले आहे.