अंजनगाव तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:31+5:302021-09-08T04:17:31+5:30
अंजनगाव सुर्जी : तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर प्रचंड वादळ व मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी ...

अंजनगाव तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
अंजनगाव सुर्जी : तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर प्रचंड वादळ व मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरीप कायम आहे. यामुळे नुकसानाचे एकंदर चित्र एक-दोन दिवसांनंतरच स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे. याशिवाय अशाप्रकारे विजेचा तांडव, त्यातही पोळ्याला पहिल्यांदाच अनुभवल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगत आहेत.
दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. परंतु, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर १ ते पहाटे ५ च्या दरम्यान विजांनी थैमान घातले. तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. मुऱ्हा, विहिगाव, हंतोडा, सातेगाव, शिरजगाव, टाकरखेडा, लखाड, मलकापूर, दहिगाव, खोडगाव, शेलगाव, देवगाव, जवर्डी, धनवाडी, सुर्जी, भंडारज, चौसाळा, चिंचोली या गावांमध्ये कपाशी, तूर, सोयाबीन, पानपिंपरी, केळी, संत्री या पिकांचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. देवगाव, खोडगाव, हंतोडा या गावांमध्ये केळी आणि संत्री या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
खोडगाव शिवारात नंदकिशोर रेखाते यांनी अडीच एकरात चार हजार केळी रोपांची लागवड सहा महिन्यांआधी केली होती. त्यातील एक हजार झाडांचे पावसाने नुकसान झाले. अतिवृष्टीने टाकरखेड येथील दोन बकऱ्या मरण पावल्या आहेत. हंतोडा व विहिगाव येथे अतिवृष्टी झाली असून, सर्वांत जास्त नुकसान तालुक्यातील हंतोडा या गावात झाले. वादळी पाऊस आणि विजांमुळे आठ घरांची पडझड झाली. पिकांसह मोठे नुकसान झाले असून प्रशासन नुकसानाचा प्राथमिक पंचनामे करीत आहे.
------------------
संपूर्ण तालुक्यात सोमवारी रात्री मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने विहिगाव-हंतोडा परिसरात अतिवृष्टी झाली. हंतोडा येथे आठ घरांची पडझड झाली. टाकरखेडा मोरे येथे दोन बकऱ्या मरण पावल्या. बऱ्याच भागात शेती पिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून प्राथमिक पंचनामा चालू आहे. नुकासनीचा अहवाल आज प्रशासनाला पाठविण्यात येईल.
- अभिजित जगताप, तहसीलदार