'मे हीट'चा पक्ष्यांनाही ताप!
By Admin | Updated: May 24, 2015 00:39 IST2015-05-24T00:39:24+5:302015-05-24T00:39:24+5:30
'या चिमण्यांनो परत फिरा.. घराकडे आपुल्या' या गीताचा अर्थ पक्ष्यांसाठी लावला तर आज शहरात राहण्यासाठी व ...

'मे हीट'चा पक्ष्यांनाही ताप!
उष्माघात : दिवस काढणेही झाले कठीण, दाणा-पाण्याचे केवळ आवाहन नको, प्रत्यक्ष कृती करा !
अमरावती : 'या चिमण्यांनो परत फिरा.. घराकडे आपुल्या' या गीताचा अर्थ पक्ष्यांसाठी लावला तर आज शहरात राहण्यासाठी व खाद्यासाठी मनुष्याने त्यांना जागा सोडलीच कुठे? त्यात मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यातील वाढत्या तापमानात माणसाप्रमाणे पक्ष्यांनाही दिवस काढणे कठीण झाले आहे. जीवसृष्टीचा समतोल बिघडू नये यासाठी पक्ष्यांना शहरात राहू द्यायचे असेल तर त्यांना पाणी, खाद्याची व्यवस्था करणे ही जबाबदारी शहरवासीयांची आहे.
मनुष्याप्रमाणे पक्षी हे उष्ण रक्ताचे असतात. बाह्य तापमानात किती तरी बदल झाला तरी पक्ष्यांच्या शरीराच्या तापमानात फारसा बदल होत नाही. परंतु वाढलेल्या तापमानाचा निश्चित परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतो. सध्या शहराच्या तापमानात सतत वाढ होत आहे. यावर्षी अचानक तापमान वाढले आहे. एका विशिष्ट तापमानाची मनुष्याप्रमाणेच पक्ष्यांना उन्हाळ्यात सवय झालेली असते; परंतु हे तापमान ४६ अंश सेल्सिअसवर गेल्याने त्याचा पक्ष्यांनाही त्रास होऊ लागतो. मग हे पक्षी पाण्यावरचे असो, माळरानावरचे असो अथवा झाडांवरचे असो. इतर सजीवांप्रमाणे पक्ष्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. काहींनी पक्ष्यांना पिण्यासाठी आपल्या घराच्या गच्चीवर प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवले आहे; पण उन्हामुळे ते पाणी गरम होत असल्याने जे शहरात शिल्लक आहे ते पक्षी त्यातील पाणी पीतच नाहीत. त्यांना मातीच्या भांड्यात पाणी ठेवले तरच ते पितात. मराठवाड्यात हरित क्षेत्र १0 टक्के नसल्याने आणि बहुतेक जलसाठे कोरडे झाल्याने पक्ष्यांवर संक्रांत आली आहे. जरी तापमान वाढले; परंतु मुबलक पिण्याचे पाणी, खाद्य आणि निवाऱ्यासाठी झाडांची भरपूर सावली असल्यास पक्ष्यांच्या जिवाला धोका होऊ शकत नाही. शहरात पक्ष्यांसाठी अन्न, पाणी, निवारा नसल्याने पक्ष्यांची अवस्था बिकट झाली आहे. पक्ष्यांनाही ऊन सहन न झाल्यामुळे व उन्हाळ्यात पाणी, पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे चक्कर येऊन पडणे, उष्माघात, यामुळे पक्षी मरत आहेत. मागील वर्षी 'मे' महिन्यात ६३ पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
शहरातील पक्षिमित्रांनी हे पक्षी सृष्टी संवर्धन संस्थेकडे उपचारासाठी आणून दिले. त्यातील अर्धे पक्षी वाचविण्यात वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांना यश आले. यंदा उन्हाचा पारा गेल्या वर्षीपेक्षा अधिक असल्याने पक्ष्यांना उष्माघाताचे त्रास होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे स्वप्निल सोनोने यांनी सांगितले.
पक्ष्यांचा घरटे
बांधण्याचा हंगाम
पक्षिमित्र यादव तरटे यांनी सांगितले की, ८० टक्के पक्षी 'मे' महिन्यात घरटे बांधण्यास सुरुवात करतात आणि एक महिन्यानंतर त्या घरट्यात ठेवलेल्या अंड्यातून पिलं बाहेर येतात. तोपर्यंत पावसाळा सुरू होत असतो. जेणेकरून गवत, पालापाचोळा व पाणी उपलब्ध होते. कीटक, अळ्या, फुले, फळे हे पक्ष्यांचे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होते आणि पिल्लांची वाढ जोमात होते. म्हणून उन्हाळ्यात पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे आपल्याकडून काही मदतीची त्यांना गरज असते. ती गरज फूल व फळे देणारी झाडे लावल्याने पूर्ण होऊ शकते.
हे करू नका
प्लास्टिकच्या कटोरीत पाणी किंवा धान्य ठेवू नका.
प्लास्टिकमुळे पाणी लवकर गरम होते.
गरम पाणी पक्षी पीत नाहीत.
कृत्रिम घरट्यात पक्षी राहत नाहीत.
कृत्रिम घरटे खरेदीत पैसे घालू नका.
काय करावे ?
पक्ष्यांना वाचविण्यासाठी
खापराच्या उथळ भांड्यामध्ये पाणी ठेवा.
गच्चीवर दिवसभर सावली असेल अशा ठिकाणी भांडे ठेवा.
खापराच्या भांड्यातच खाद्य ठेवा.
मूठभर ज्वारी किंवा बाजरी, खरकटे अन्न, बिस्किटाचा चुरा ठेवू शकतात.
समतोल साधण्यासाठी ही कृती
पक्ष्यांना मनुष्यांप्रमाणे घामग्रंथी नसतात. त्यामुळे त्यांना वाढलेल्या तापमानात तोंड उघडे ठेवणे भाग पडते. तोंडाद्वारे पक्ष्यांना आपल्या शरीराच्या तापमानाचा समतोल साधावा लागतो.
पक्ष्यांची दिनचर्या
तीव्र उन्हाचा त्रास होत असल्याने पक्षी सकाळीच उठून भक्ष शोधण्यासाठी घरट्याबाहेर पडतात. साधारणत: दुपारच्या वेळी ते झाडांवर, घराच्या कानाकोपऱ्यात, कपारीत विश्रांती घेतात. सायंकाळी ऊन कमी झाल्यावर पुन्हा ते भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, आता शहरात फुलांची झाडेच कमी झाल्याने खाद्य व विश्रांतीसाठी त्यांना जागाच राहिली नाही. यामुळे पक्ष्यांची संख्या शहरात कमी दिसत आहे.