साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:31+5:302021-06-02T04:11:31+5:30
अमरावती : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने १४ पथके तालुकास्तरावर तयार केली ...

साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
अमरावती : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने १४ पथके तालुकास्तरावर तयार केली आहेत. संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवणे आणि या काळात अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ही पथके कार्यरत राहणार आहेत.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अस्वस्थ वाटणे, थकवा वाढणे, डेंग्यू, मलेरिया आणि साथरोगांचा फैलाव होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबाबत नियोजन सुरू आहे. यासाठी जिल्हाभरात विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय एक पथक, तालुकास्तरीय १४ पथके व जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथक २४ तास कार्यरत असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात काही प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे यंदा एक जूनपासून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिण्यात येते. त्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार पसरतात. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे पथके स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणांना सूचना करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
बॉक्स
अशी घ्या काळजी
पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत, नळ गळती असल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.
पाणी शुद्धीकरण करावे, याशिवाय खाजगी नळ कनेक्शन गटाराखालून जात असेल, तर त्याची गळती होत नसल्याची पाहणी करावी, तसेच घनकचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
कोट
पावसाळ्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामस्थांनी पावसाळ्यामध्ये आठवड्यातून दोन दिवस कोरडा दिवस पाळावा. नेहमी घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, तसेच पाणी गाळून शुद्धीकरण करून किंवा शक्य झाल्यास गरम करून प्यावे, यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांपासून बचाव करतात येऊ शकतो.
मनीषा सूर्यवंशी
साथरोग वैद्यकीय अधिकारी, अमरावती