‘तो’ दुचाकीवर घेतो चारचाकीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:36+5:30
गावोगावी फिरून साहित्यविक्री करणारा मोर्शी तालुक्यातील राजेश छापाने व्यवसायाच्या निमित्ताने दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास दुचाकीने करतो. वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या दुचाकीचे स्वरूप बदलवून चारचाकी वाहनातून मिळू शकणाऱ्यां सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले.

‘तो’ दुचाकीवर घेतो चारचाकीचा आनंद
अमित कांडलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी (तिवसा) : नानाविध संकल्पना प्रत्यक्षात उतरवून समाज माध्यमात अधिराज्य गाजविणाऱ्या ध्येयवेड्या, कल्पक तरुणांपैकी एक खानापूरच्या राजेश छापाने या युवकाने आपल्या बाईकला कारचे ‘लूक’ दिले आहे.
गावोगावी फिरून साहित्यविक्री करणारा मोर्शी तालुक्यातील राजेश छापाने व्यवसायाच्या निमित्ताने दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास दुचाकीने करतो. वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या दुचाकीचे स्वरूप बदलवून चारचाकी वाहनातून मिळू शकणाऱ्यां सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याला पचमढीच्या प्रवासात मिळालेला ‘आँखो देखा हाल’ उपयोगात आला तेथील प्रवासात त्याने एका दुचाकीला चारचाकीचे स्वरूप दिल्याचे पाहिले होते. अशीच आपलीदेखील दुचाकी असावी, अशी खूणगाठ मनाशी बांधून त्या दिशेने प्रयत्न चालवले. दुचाकीवर एक लोखंडाची फ्रेम बनवून घेतली. त्याला आतून आणि बाहेरून ऑटोरिक्षासारखे लेदरचे कव्हर बसविले. आतून व बाहेरून एलइडी दिवे बसविले. संगीत ऐकण्यासाठी एफएमसारखी सुविधा निर्माण केली. पुढच्या बाजूला पारदर्शी काच बसविला. मागच्या बाजूला मोठा टेल लॅम्प आणि रेटून बसण्यासाठी त्या पद्धतीची सीट बनवून घेतली. दुचाकीच्या एकाच बॅटरीवर ही सगळी उपकरणे तो चालवतो. वयाच्या ३४ व्या वर्षी राजेश या ‘मॉडिफाय’ वाहनातून गावोगावी फिरून मार्केटिंग करीत असतो. हे वाहन ऊन, वारा, पाऊस व उपद्रवी कीटकांपासून वाचवित असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले. हा कौतुकाचा विषय ठरला आहे.