...अन् प्रेयसीसमक्षच ‘तो’ फासावर झुलला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:55+5:30
दुपारी त्याची प्रेयसी घरी आल्याने तो परतला. त्यानंतर ते दोघेही दस्तुरनगर स्थित घराच्या वरच्या खोलीत बसले. तेथे तिने पळून जाऊन लग्नाचा हेका धरला. माझ्या कुटुंबीयांचा होकार आहे, तू तुझ्या कुटुंबांना समजव, असे तो म्हणाला. ती मात्र ठाम राहिली. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. हतबल होत त्याने तिच्याच समोर ओढणीने स्लॅबच्या कडीला गळफास घेतला. जयेश फासावर झुलल्याचे लक्षात येताच ती ओरडतच त्या खोलीबाहेर पडली.

...अन् प्रेयसीसमक्षच ‘तो’ फासावर झुलला!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रेयसीने पळून जाऊन लग्न करण्याचा हेका धरल्याने प्रियकर तिच्यासमोरच फासावर झुलला. तिला काही क्षणासाठी ती गंमतच वाटली. मात्र, ती गंमत नव्हे, त्याने खरोखरच गळफास घेतला, हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. त्या हेक्यापोटी तो जीव गमावून बसला. तो जिवाने गेला अन् दुसरीकडे तिच्याविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
दस्तुरनगर भागात ५ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. जयेश श्यामकुमार दादलानी (२५, दस्तुरनगर) असे मृताचे नाव आहे. राजापेठ पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची व ५ एप्रिल रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास संबंधित तरुणीविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. जयेशचे शंकरनगर परिसरातील २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. ते लग्नदेखील करणार होते. त्यांच्या लग्नाला जयेशच्या कुटुंबाचा विरोध नव्हता. मात्र, मुलीचे पालक टाळाटाळ करीत होते. त्यानंतरही घरच्यांच्या विरोधात जाऊन ती जयेशला पळून जाऊन लग्न करण्याचा आग्रह धरत होती. तसे न केल्यास जयेशला व त्याच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत होती. पळून जाऊन विवाह न केल्यास आपण आपल्या जीवाचे बरे-वाईट करू, अशी धमकी ती जयेश व त्याच्या कुटुंबीयांना देत होती.
निर्णय घ्या, अन्यथा जयेशचा शेवटचा दिवस
तक्रारीनुसार, आरोपी तरुणीने जयेशच्या नातेवाइकाला ५ एप्रिल रोजी कॉल केला. आज निर्णय न झाल्यास जयेशच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, अशी धमकी तिने दिली. आता पुढे काय, ही चिंता असतानाच जयेशने आत्महत्या केली. त्याबाबतही जयेशच्या वडिलांनी तक्रारीतून ऊहापोह केला आहे.
पळून जाऊन लग्न करण्याच्या हेक्याने प्रेमकहाणीचा अकाली अंत : प्रेयसीविरुद्ध गुन्हा
तिला गंमतच वाटली : जयेश ५ एप्रिलला सकाळी ८ च्या सुमारास नांदगाव पेठ एमआयडीसीत कामावर गेला. दुपारी त्याची प्रेयसी घरी आल्याने तो परतला. त्यानंतर ते दोघेही दस्तुरनगर स्थित घराच्या वरच्या खोलीत बसले. तेथे तिने पळून जाऊन लग्नाचा हेका धरला. माझ्या कुटुंबीयांचा होकार आहे, तू तुझ्या कुटुंबांना समजव, असे तो म्हणाला. ती मात्र ठाम राहिली. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. हतबल होत त्याने तिच्याच समोर ओढणीने स्लॅबच्या कडीला गळफास घेतला. जयेश फासावर झुलल्याचे लक्षात येताच ती ओरडतच त्या खोलीबाहेर पडली.
मृताच्या पित्याच्या तक्रारीवरून एका तरुणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. तिने पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याची तक्रार आहे.
- भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त