म्हणे त्याला मिर्गी येते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST2020-12-16T04:29:49+5:302020-12-16T04:29:49+5:30
अनिल कडू परतवाडा : एकटी महिला दिसली की, त्याला म्हणे मिर्गीचा झटका येतो आणि स्वत:च्या दुकानातील कोंबड्या सोडून तो ...

म्हणे त्याला मिर्गी येते!
अनिल कडू
परतवाडा : एकटी महिला दिसली की, त्याला म्हणे मिर्गीचा झटका येतो आणि स्वत:च्या दुकानातील कोंबड्या सोडून तो त्या महिलेच्या मागे लागतो. मागून जाऊन महिलेचा गळा, तोंड दाबून विकृत चाळे करतो. अशा विकृत चाळे करणाऱ्याला महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी त्या विकृत इसमाला अटक केली आहे.
परतवाडा शहरातील चिखलदरा स्टॉपवर या विकृत इसमाचे चिकन-मटण विक्रीचे दुकान आहे. तो दुकानात असताना रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांकडे त्याचे लक्ष राहते. महिलांकडे बघता-बघताच त्याला म्हणे मिर्गीचे झटके येतात. या झटक्यात तो दुकानाबाहेर पडतो आणि हाती येईल त्या महिलेच्या मागे अलगद जाऊन उभा होतो. क्षणाची उसंत न घेता तो त्या महिलेच्या गळ्यात हात टाकून तिचे तोंड दाबतो व विकृत चाळे करतो. त्याची अशी सवयच होऊन बसली असून, आतापर्यंत सहा महिलांवर त्याने हा प्रकार केला. त्याचे हे कृत्य लक्षात येताच तीन वेळा स्टॉपवरील लोकांनी पकडून त्याला चांगलेच चोपून काढले. एका घटनेत तर त्याने पांढऱ्या पुलावरून एका महिलेला खाली फेकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सहा घटनांपैकी तीन घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्या. यात एक घटना पोलिसांकडे दाखल आहे. दुसरे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले, पण नंतर मागे घेतले गेले. १४ डिसेंबरला घडलेली घटना परतवाडा पोलीसांनी नोंदवून घेतली आहे. ही महिला निमकुंड येथून परतवाड्यात बाजाराला आली होती. तिच्यावर हा प्रसंग ओढवला. स्टॉपवर उभ्या असलेल्या युवकाने त्या महिलेची सुटका केली व पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून त्या इसमाविरुद्ध भादंविचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.