हाहाकार
By Admin | Updated: July 27, 2014 23:29 IST2014-07-27T23:29:13+5:302014-07-27T23:29:13+5:30
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारच्या पहाटेपासून सुरू झालेली संततधार आणि मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. अप्पर वर्धा, पूर्णा

हाहाकार
चांदूरबाजार, वरुड, मोर्शी तालुक्यात सर्वाधिक नुकसान
अमरावती / लोकमत चमू : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारच्या पहाटेपासून सुरू झालेली संततधार आणि मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. अप्पर वर्धा, पूर्णा धरणाने पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील २२ गावांत पूरस्थिती निर्माण झाली. चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील तीन युवक पुरात वाहून गेले. त्यापैकी स्वप्नील वांगे या युवकाचा मृतदेह गावालगत नदीच्या गाळात अडकलेला आढळून आला. वरूड तालुक्यातील तिवसाघाट येथे चुडामण नदीला आलेल्या पुरात एक युवक वाहून गेला. या पुुरात अडकलेल्या अन्य सहा जणांना गोताखोरांच्या सहाय्याने वाचविण्यात प्रशासनाला यश आले. संततधार पावसामुळे अप्परवर्धा धरणाने धोक्याची पातळी ओलांडली व धरणाचे सर्व तेराही दरवाजे तर पूर्णा धरणाच्या नऊ दरवाजांसह बगाजी सागर धरणाची ३१ दारे उघडण्यात आली आहेत. यातून वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. जलमय झालेल्या चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी व घाटलाडकी गावात जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाचे अविरत कार्य सुरू आहे.
ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकीत पुराचे थैमान
जिल्ह्यातील संततधार पाऊस आणि मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णा धरणाची पातळी अचानक वाढल्याने धरणाची सर्व ९ दरवाजे तब्बल ३ मीटरने उघडण्यात आली. धरणाचे पाणी अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील ब्राह्मणवाडा (थडी) गावात शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चारघड प्रकल्पाचे पाणी घाटलाडकी गावात शिरल्याने नदीकाठच्या १० ते १२ कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पुरात तीन युवक वाहून गेले असून त्यापैकी स्वप्नील वांगे नामक १७ वर्षीय युवकाचा मृतदेह गावालगत नदीच्या गाळात आढळून आला.
पुरामध्ये विजेच्या खांबावर अडकलेल्या दोघांना तर झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पूर्णा व चारघड नदीकाठच्या सर्व गावांना पुराचा मोठा धोका उत्पन्न झाल्याने मदतकार्यासाठी जिल्हा प्रशासनाची रेस्क्यू टीम ब्राम्हणवाडा थडी येथे पोहोचली आहे. पूरजन्य परिस्थितीची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीओ अचलपूर, तहसीलदार चांदूरबाजारसह जिल्ह्यातून रेस्क्यू टीम ब्राम्हणवाड्याकडे रवाना केली. वृत्त लिहिस्तोवर अडकलेल्या इसमांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते.
नदीचे पाणी गावाच्या मध्यभागी असलेल्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचल्याने अर्धेअधिक गाव पाण्याखाली गेले आहे. याची झळ नजीकच्या काजळी व देऊरवाडा या दोन्ही गावांना बसली असून काजळी ९० टक्के तर देऊरवाडा ५० टक्के पाण्यात असल्याची माहिती जि.प. सदस्य मनोहर सुने यांनी दिली. या पाण्यामुळे घराच्या भिंती कोसळत असून नदीकाठच्या गावांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
घाटलाडकी परिसरातील प्रायमरी शाळा व उर्दू शाळा सद्यस्थितीत पाण्यात असून घाटलाडकी शेजारच्या दोन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरूच असल्याने घाटलाडकीचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.
घाटलाडकी गावात नुकसान
चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील आमच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने चारगड नदीला पूर येऊन पाणी घाटलाडकी गावात शिरले. नदी काठच्या १५ घरांमध्ये पाणी शिरले. येथील उर्दू प्राथमिक शाळेसह बाजार ओळीतही पाणी शिरले.
नदीकाठच्या शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्रा झाडे पूर्णत: झोपली. या गावातील नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इसारा देण्यात आला आहे.