संत्र्यांच्या कवडीमोल भावाने शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: January 18, 2015 22:30 IST2015-01-18T22:30:29+5:302015-01-18T22:30:29+5:30
वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मात्र झाडावरील संत्र्यावरसुध्दा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची मागणी घटली. संत्र्याला १० ते ११ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत a

संत्र्यांच्या कवडीमोल भावाने शेतकरी हवालदिल
संजय खासबागे - वरुड
वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मात्र झाडावरील संत्र्यावरसुध्दा किडीचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची मागणी घटली. संत्र्याला १० ते ११ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत असल्याने संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. आंबिया बहराच्या संत्र्याचे आयुष्मान संपल्याने त्यामध्ये किडीचासुध्दा प्रादुर्भाव होऊन अळया पडत आहेत.
वरुड तालुक्यात गत ७० वर्षांपासून संत्रा उत्पादन घेतले जात आहे. शेंदूरजनाघाट हे संत्राचे माहेरघर म्हणून प्रसिध्द आहे. येथे शास्त्रीय पध्दतीने संत्रा कलमांची निर्मिती केली जाते. शेकडो हेक्टर जमिनीत संत्राबागा तयार करण्यात आल्या आहेत. कोट्यवधींची उलाढाल या परिसरात होत होती.परंंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा संत्रा आंबिया बहराची फळे विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. आंतरराज्यीय बाजारपेठेत भाव कोलमडल्याने स्थानिक पातळीवर दर घसरले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संत्रा तोडला नसल्याने लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. १० ते ११ हजार रुपये प्रतिटनांचे भाव आहे. अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. आजही ३० ते ४० टक्के संत्रा झाडावरच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडल्यागत अवस्था झाली उत्पादन असले तरी भाव कमी असल्याने लाखो रुपयांचा भार संत्रा उत्पादकावर पडला आहे. संत्रा पिकाच्या मशागतीसाठी १२ ते १५ रुपये प्रति झाडाला खर्च येतो. दुष्काळी वर्षामध्ये उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाल्याने संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे.