महत्प्रयासाने वाचले गर्भवतीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:24 IST2019-08-04T22:24:26+5:302019-08-04T22:24:51+5:30
आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिकेचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करण्यात आली. संपूर्ण मेळघाटात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना डॉक्टरांनी त्या महिलेसह तिच्या नवजाताचे वाचविलेले प्राण आरोग्य यंत्रणेची मान उंचावणारे ठरले.

महत्प्रयासाने वाचले गर्भवतीचे प्राण
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिकेचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करण्यात आली. संपूर्ण मेळघाटात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना डॉक्टरांनी त्या महिलेसह तिच्या नवजाताचे वाचविलेले प्राण आरोग्य यंत्रणेची मान उंचावणारे ठरले.
गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता बेला येथील एका गर्भवती आदिवासी महिलेला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यासंदर्भात आशा स्वयंसेविकेने चार किलोमीटर अंतरावरील सलोना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती दिली. डॉक्टराच्या सूचनेनुसार, चालकाने रस्त्यावरून वाहत असलेले पाणी, चिखल, निसरड्या वाटेवरून स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णवाहिका काढली. त्या गर्भवतीला सलोना येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे तिची प्रसूती झाली. वैशाली झनकलाल बेलसरे (२०) असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे.
वैशाली हिला हृदयाचा आजार असल्याने प्रसूतीच्या वेदना असह्य होत्या. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून यशस्वी प्रसूती केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अमोल सुर्वे , एच. व्ही. इंगळे, परिचारिका संजीवनी सोळंके, रेणुका झरेकर सह वाहन चालक प्रदीप पवार यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. गत आठवड्यात मोथा येथील एका गर्भवती महिलेला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात मात्र, सोबत डॉक्टर नसल्यामुळे धावत्या रुग्णवाहिकेत प्रसूती होऊन बाळ दगावले होते.
कोट्यवधींचा खर्च, खड्डेमय रस्ते
मेळघाटात रस्त्यांचा अनुशेष आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. दरवर्षी रस्ते दुरुस्ती व निर्मितीवर कोट्यवधींचा खर्च होऊनही आदिवासी व यंत्रणेची ससेहोलपट संबंधित विभागाची पोलखोल करणारी ठरली.
रस्त्यावर पूर्णत: चिखल होता. दुसरीकडे पाण्यामुळे रस्ता बंद होता. मात्र, धाडस करून रुग्णवाहिका नेली व गर्भवती महिलेस आरोग्य केंद्रात भरती केले.
- प्रदीप पवार,
चालक प्रा.आ. केंद्र, सलोना