अट्टल गुन्हेगाराने पोलिसाला मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:59+5:30
शेख निजाउद्दीन शेख निजामुद्दीन ऊर्फ हनुमान (२६, रा. अलीमनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी व जखमी असलेले नागपुरीगेट पोलीस ठाण्याचे जमादार अशोक बुंदेले यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, आरोपी इजाद्दीन हा अट्टल गुन्हेगार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे.

अट्टल गुन्हेगाराने पोलिसाला मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेल्या जमादाराला विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराने दगडाने हल्ला चढवून जखमी केले. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला चोप दिला. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली.
शेख निजाउद्दीन शेख निजामुद्दीन ऊर्फ हनुमान (२६, रा. अलीमनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी व जखमी असलेले नागपुरीगेट पोलीस ठाण्याचे जमादार अशोक बुंदेले यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, आरोपी इजाद्दीन हा अट्टल गुन्हेगार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे. तो शुक्रवारी सकाळी इर्विन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. तेथे दोन पोलिसांशी त्याने हुज्जत घातली. हे माहिती होताच पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेले जमादार अशोक बुंदेले यांनी भांडण सोडवून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर शेख निजाउद्दीनने हल्ला चढविला. त्यांच्या डाव्या मांडीला दुखापत झाली आहे.
पोलिसावर दगड मारल्याची लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी शेख निजाउद्दीनला चोप दिला. यादरम्यान शहर कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. निजाउद्दीन एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने दगडफेक करून शहर कोतवाली ठाण्याच्या पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या.
शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणल्यानंतरसुद्धा निजाउद्दीन हा पोलिसांना शिवीगाळ करीत होता. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३६, ५०४, ५०६, ४२७, सहकलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियमनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा पोलीस उपनिरीक्षक नरेश मुंडे यांनी दाखल केला. पुढील तपास शहर कोतवाली पोलीस करीत आहेत.
वाहनाच्या काचा फोडल्यानंतर दुरुस्ती
अट्टल गुन्हेगार असलेल्या शेख निजाउद्दीने पोलिसांचे वाहन क्रमांक एमएच२७ एए १७१ च्या दगड मारुन काचा फोडून नुकसान केल्यानंतर सदर वाहन सिटी कोतवालीत आणल्यानंतर वाहनाचे चालक पोलीस हवालदार विलास सरोदे यांनी वाहनाची दुरुस्ती केली.जेव्हा आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी वाहनात उपस्थित होते.