तापी धरणाच्या अफवेने धारणीकर हैराण
By Admin | Updated: December 4, 2014 23:02 IST2014-12-04T23:02:25+5:302014-12-04T23:02:25+5:30
‘तापी धरणाचा जाहीरनामा उपविभागीय अधिकारी कार्यालयात लागला आहे. यात धारणीसह आसपासची गावे बुडणार’ अशा अफवांनी सध्या धारणीसह परिसरातील २५ गावांची झोप उडाली आहे.

तापी धरणाच्या अफवेने धारणीकर हैराण
श्यामकांड पाण्डेय - धारणी
‘तापी धरणाचा जाहीरनामा उपविभागीय अधिकारी कार्यालयात लागला आहे. यात धारणीसह आसपासची गावे बुडणार’ अशा अफवांनी सध्या धारणीसह परिसरातील २५ गावांची झोप उडाली आहे. ज्याच्या-त्याच्या तोंडी सध्या हीच चर्चा ऐकायला मिळत आहे. याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहे. त्यामुळे येथील बडे शेतकरी व व्यावसायिक चिंतेत पडले आहे.
याबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी 'लोकमत' प्रतिनिधीने एसडीओ कार्यालयात चौकशी केली असता सूचना फलकावर गडगा मध्यम प्रकल्पासंदर्भात अधिसूचना जारी केल्याचा जाहीरनामा प्रसिध्दीसाठी लावला होता. या जाहीरनामा/अधिसूचनेत विभागीय आयुक्तांनी २३ आॅक्टोबर रोजी प्रकल्पबाधित व्यक्तिंच्या पुनर्वसन अधिनियम १९९९ चे कलम ११(१)नुसार अधिसूचना जारी केली होती. यामध्ये गडगा मध्यम प्रकल्पातील बाधित व लाभक्षेत्रात समाविष्ट गावांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, बाधित गावांच्या यादीत ७ गावांचा समावेश असून त्यात धावडी, तातरा, झिलांगपाटी, बिजुधावडी, गडगामालूर, हातिदा आणि मोगर्दा या गावांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लाभक्षेत्रातील संभाव्य गावांच्या यादीमध्ये २५ गावांचा समावेश आहे. यात धावडी, बारू, जुटपाणी, झापल, मांडवा, कुसुमकोट खुर्द, दिया, तलई, टाकरखेडा, टिंगऱ्या, धारणी, खाऱ्या, सोनाबर्डी, बाबंदा, टेमली, शिरपूर, राणीतंबोली, कुसुमकोट बुजुर्ग, दहिंडा, रत्नापूर, मोखा, चिंंंचघाट, गोंडवाडी, चुतिया आणि चिखलपाट या गावांचा समावेश आहे.
याच गावातील यादीला धरून काही टवाळखोरांनी उलटसुलट चर्चा पसरवली असून या चर्चेचा मुख्य भाग एसडीओ कार्यालयातील जाहीरनामाच आहे.
यात तापी धरणाचा कोठेही उल्लेख नाही. गडगा मध्यम प्रकल्पाबाबत ही अधिसूचना आहे. त्यातही धारणी व परिसरातील २५ गावे लाभक्षेत्रात येत असल्याने त्यांचा आनंद या अफवेने हिरावून घेतला आहे. यावरून अनेक वर्षांपासून प्रलंबित तापी प्रकल्पाची भीती किती प्रमाणात आहे, याचा अंदाज लावता येतो.