भाजप नगरसेवकाशी हमरीतुमरी, मारहाणीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:57+5:302021-07-07T04:14:57+5:30
अमरावती : जुन्या राजकीय वैमनस्यातून भाजपचे तरुण नगरसेवक आशिष अतकरे यांच्याशी लोंबाझोंबी करण्यात आली. शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न करण्यात ...

भाजप नगरसेवकाशी हमरीतुमरी, मारहाणीचा प्रयत्न
अमरावती : जुन्या राजकीय वैमनस्यातून भाजपचे तरुण नगरसेवक आशिष अतकरे यांच्याशी लोंबाझोंबी करण्यात आली. शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अतकरे यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी राजा खारकर (रा. माळीपुरा) व अन्य तिघांविरुद्ध भादंविचे कलम २९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, राजा खारकर हा भाजपच्या अंबा मंडळाचा माजी पदाधिकारी, तर आशिष अतकरे हे त्या प्रभागाचे नगरसेवक आहेत. अतकरे हे रविवारी रात्री त्यांच्या आनंदनगर स्थित एका मित्राच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून हनुमाननगर परिसरातील एका धाब्याजवळ हरी सावरकर यांच्याशी बोलत असताना राजा खारकर हा दुचाकीवरून अन्य तीन मित्रांसमवेत आला. त्याने अश्लील शिवीगाळ करून अतकरे यांच्यावर हात उगारला. प्रत्युत्तरात दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. तो वाद सामंजस्याने सोडवून अतकरे घरी परतले. थोड्या वेळानंतर राजा खारकर याच्या समर्थनार्थ २५ ते ३० जण अतकरे यांच्या घरी पोहोचले. तेथेदेखील अतकरे व त्यांच्या कुटुंबीयांशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी आशिष अतकरे यांनी खोलापुरी गेट पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खोलापुरी गेटचे ठाणेदार तामटे यांनी दिली.