विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट
By Admin | Updated: May 12, 2015 00:15 IST2015-05-12T00:15:46+5:302015-05-12T00:15:46+5:30
विदर्भातील वातावरण बदलामुळे काही ठिकाणी मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व ११ ते १५ मे दरम्यान तुरळक ...

विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट
हवामान तज्ज्ञांचा अंदाज
११ ते १५ मे दरम्यान वातावरणात बदल
अमरावती : विदर्भातील वातावरण बदलामुळे काही ठिकाणी मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व ११ ते १५ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
भर उन्हाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे जनतेची चिंताही वाढली आहे. अफगाणिस्थानच्या आसपासच्या भागावर चक्राकार वारे वाहात असून मध्य प्रदेश, तामिळनाडू ते विदर्भावर कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हरियाणा, गांगेय, पश्चिम बंगाल, मलय बेटाच्या १५०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पावसासाठी अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मध्यभारतात कमाल तापमान २ ते ३ डिग्री सेल्सीअसने कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा जोर वाढला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह शहरवासियांनाही हैराण केले होते. त्यातच पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
सद्यस्थितीत वातावरण पावसासाठी अनुकूल आहे. त्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. ११ ते १५ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळू शकतो. काही ठिकाणी गारपीटही संभवते. यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.
- अनिल बंड,
हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.