पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:00 IST2019-07-31T00:59:36+5:302019-07-31T01:00:07+5:30
जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

पावसाचा कहर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात संततधार पावसाने पाचव्याही दिवशी सूर्यदर्शन झालेले नाही. मेळघाटसह चांदूरबाजार तालुक्यात पावसाचा कहर अद्याप सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २७.२ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यासह सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान पावसाने बाधित घरांचे पंचनामे तलाठ्यांद्वारे करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने झड लावली आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. या पाच दिवसांत तीन तालुक्यांसह २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, तर जिल्ह्याच्या सरासरी पावसामध्ये २२६ ते चार दिवसांत ३३७ मिमी अशी वाढ झालेली आहे. तरीही अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ८० मिमीने पाऊस माघारलेला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २७.२ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ७३ मिमी पाऊस धारणी तालुक्यात झाला. चिखलदरा ५१.६ मिमी, अमरावती २७.३ मिमी, भातकुली १०.८ मिमी, नांदगाव १६.८ मिमी, चांदूर रेल्वे २१.२ मिमी, धामणगाव रेल्वे २४.३ मिमी, तिवसा २०.९ मिमी, मोर्शी २४.९ मिमी, वरूड २६.३ मिमी, अचलपूर १९.६ मिमी, चांदूरबाजार ४७.१ मिमी, दर्यापूर ९.९ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७.३ मिमी अशी नोंद झालेली आहे.
४३ तासानंतर मिळाला आदित्यचा मृतदेह
अंजनगाव सुर्जी : नजीकच्या शहानूर प्रकल्पस्थळी हौसेखातर मासळी पकडण्यास गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासानंतर मंगळवारी दुपारी मिळाला. आदित्य शांताराम कलबागे (२२, आनंदनगर, ता दर्यापूर) मृत तरुणाचे नाव आहे. २८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आदित्य शहानूर प्रकल्पात वाहून गेला होता. महसूल, पोलीस व अन्य यंत्रणेच्या वारंवार पाठपुराव्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहानूर प्रकल्पावर पोहोचले. घटनेच्या २४ तासानंतर बचाव पथक आल्याने मृताचे कुटुंबीय व अन्य प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला. दरम्यान पावसाचा वाढता जोर व प्रकल्पातील जलसाठा वाढू लागल्याने सोमवारी रात्री ८.३० वाजता बचावकार्य थांबविण्यात आले. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास गाळात फसलेल्या आदित्यच्या मृतदेहाला नदीपात्राबाहेर काढण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यानंतर आदित्यचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.