गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त
By प्रदीप भाकरे | Updated: October 6, 2025 17:18 IST2025-10-06T17:14:57+5:302025-10-06T17:18:17+5:30
गुटख्याच्या ट्रकमागे ‘बडनेरा कनेक्शन’ : दोन जणांविरुद्ध गुन्हा

Gutkha seized! Police action on Badnera road; Gutkha worth 3 lakhs seized
अमरावती : मालवाहू वाहनातून शासन प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख ७ हजार २०६ रुपयांचा गुटखा व मालवाहू वाहन असा १० लाख ७ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बडनेरा मार्गावर करण्यात आली.
अफसर खान मिया खान (५०) रा. कमेला ग्राउंड, अमरावती असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एक जण मालवाहू वाहनातून बडनेरा मार्गाने शासन प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बडनेरा मार्गावर सापळा रचून सदर वाहन अडविले. वाहनचालकाची चौकशी केल्यावर त्याने आपली ओळख अफसर खान मिया खान अशी दिली. मालवाहू वाहनाची पाहणी केल्यावर त्यात शासन प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्याच्याकडून गुटखा व मालवाहू वाहन असा १० लाख ७ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला गुटख्याबाबत विचारणा करण्यात आल्यावर त्याने तो अमीन शेख रा. बडनेरा याचा असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, संदीप खंडारे यांनी केली.