मालवाहू वाहनातून १० लाखांचा गुटखा जप्त; विशेष पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:21 IST2021-12-10T18:12:42+5:302021-12-10T18:21:04+5:30
९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मालवाहू वाहनाच्या झडतीदरम्यान ९ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले.

मालवाहू वाहनातून १० लाखांचा गुटखा जप्त; विशेष पथकाची कारवाई
अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोरील मार्गावरील मालवाहू वाहनाच्या झडतीदरम्यान तब्बल ९ लाख ८५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
९ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहनदेखील जप्त करण्यात आले. वाहनचालक मो. अजहर मो. सलिम (३२, पाकिजा कॉलनी) याला अटक करून नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांनी आपल्या पथकासह वलगाव मार्गावरील एका पेट्रोलपंपाजवळ एमएच ०६ बीडब्ल्यू ०५३४ हे वाहन तपासले असता, त्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
रामपुरी कॅम्पमध्ये ‘क्राईम’ची धाड
शहर गुन्हे शाखेने रामपुरी कॅम्प भागातील एका घरात धाड घालून तेथून ३८ हजार ३३८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. १० डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तेथून जोतिष ऊर्फ जॉनी मंगवानी (३६, रामपुरी कॅम्प) याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पीएसआय राजकिरण येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.