‘बारूद’ गँगच्या कारवाया आता ‘आरडीएक्स’ नावाने

By Admin | Updated: August 17, 2015 00:01 IST2015-08-17T00:01:26+5:302015-08-17T00:01:26+5:30

जुळ्या नगरीत ‘बारूद गँग’ या नावाने दहशत पसरविणाऱ्या मस्तवाल गुंडांनी अवघ्या महिनाभरापूर्वी टोळीचे नाव बदलवून ‘आरडीएक्स गँग’ केल्याची ...

The 'gunpowder' gang is now known as 'RDX' | ‘बारूद’ गँगच्या कारवाया आता ‘आरडीएक्स’ नावाने

‘बारूद’ गँगच्या कारवाया आता ‘आरडीएक्स’ नावाने

अमरावती / अचलपूर : जुळ्या नगरीत ‘बारूद गँग’ या नावाने दहशत पसरविणाऱ्या मस्तवाल गुंडांनी अवघ्या महिनाभरापूर्वी टोळीचे नाव बदलवून ‘आरडीएक्स गँग’ केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.
वाळू तस्करीला विरोध केल्याच्या कारणावरून अचलपूर येथील अमित बटाऊवाले नामक तरण्याताठ्या युवकाचा निष्कारण बळी गेला. पोलिसांचा वरदहस्त आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे मनोबल उंचावलेल्या गुंडांनी दिवसा-ढवळ्या अमित या मितभाषी तरूणाला अत्यंत क्रूर पध्दतीने यमसदनी धाडले ‘बारूद’ आणि आता ‘आरडीएक्स’नावाने हैदोस घालणाऱ्या, दहशत पसरविणाऱ्या ‘त्या’ गुंडांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही वर्षांपूर्वी अचलपूर उपजिल्हा रूग्णालय परिसराला अतिक्रमणाने वेढले असताना तत्कालीन नगराध्यक्ष व ठाणेदारांनी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या घटनेतील आरोपी नगरसेवक मो.शाकीर हुसैन याने हस्तक्षेप केल्याने अतिक्रमण हटविता आले नव्हते. ‘बारूद गँग’च्या सदस्यांचा उपजिल्हा रूग्णालय परिसरात ‘अड्डा’ होता. अनेक गैरव्यव्यवहार येथून चालत असत. त्यामुळेच अतिक्रमण हटविण्यास विरोध झाला होता. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी मुलींच्या छेडखानीच्या मुद्यावरून मोहन ठाकूर यांना मारहाण झाली होती.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
अमरावती / अचलपूर : या कारणावरून परतवाड्यातील मोहन ठाकूर यांना उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गाठून बारूद गँगच्या सदस्यांनी पाईप-लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. यात ठाकूर यांचे पाय कायमस्वरूपी निकामी झाले. दिवसाढवळ्या एखाद्या माणसाला अपंगत्व येईपर्यंत मारहाण करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या पोलिसांनी त्यावेळीच आवळल्या असत्या तर आज या गुंडांचे मनोबल एवढे वाढले नसते, असा नागरिकांचा सूर आहे. सुरूवातीची कुजबूज आता उघड-उघड चर्चेत बदलली असून येथील जनता उघडपणे रोष व्यक्त करू लागली आहे. वाळू तस्करांचे गुन्हेगारीच्या सर्वच प्रकारात असलेले हस्तक्षेप, त्यांना अचलपूर-परतवाड्याखेरीज बाहेरच्या गुन्हेगारी जगतातील दिग्गजांचे असलेले अप्रत्यक्ष समर्थन, राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासनानेदेखील या गुंडांच्या कारवायांकडे हेतुपुरस्सर केलेले दुर्लक्ष या सर्वच बाबी आणि इतरही शंकाकुशंका आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. कुणाच्या छत्रछायेखाली ही ‘बारूद गँग’ पनपली?, बाहेरच्या सराईत गुन्हेगारांचे यांना समर्थन तर नाही ना?, दिवसाढवळ्या हत्या करेपर्यंत या गुंडांची मजल गेलीच कशी?, यांचे मनोबल कुणी उंचावले? या सर्व घटकांच्या आधारे आता या घटनेचा तपास व्हावा, असा जुळ्या नगरीतील सामान्य जनतेचा सूर आहे. तुर्तास बारूद गँगचे सदस्य शहरातून फरार आहेत. यासंदर्भात प्रक्षोभक संदेशांचे आदानप्रदान भ्रमणध्वनीवरून सुरू असल्याची चर्चासुध्दा जुळ्या नगरीत सुरू आहे. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या मोहन बटाऊवाले यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तालुक्यातील तणाव सध्या निवळला असला तरी लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया मात्र अद्यापही उमटत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये बाहेर पडू शकतात. (प्रतिनिधी)

Web Title: The 'gunpowder' gang is now known as 'RDX'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.