पालकत्व बालगृहाचे वास्तव्य महाविद्यालय वसतिगृहात!
By Admin | Updated: December 24, 2014 22:51 IST2014-12-24T22:51:24+5:302014-12-24T22:51:24+5:30
तपोवनला पालकत्त्व देण्यात आलेल्या अंबाचे वास्तव्य एका शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आहे. 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन' कायद्यांतर्गत अंबाची संपूर्ण जबाबदारी बालगृहाकडे असावी, असे अपेक्षित आहे.

पालकत्व बालगृहाचे वास्तव्य महाविद्यालय वसतिगृहात!
नियमांचा गुंता : 'तिचे बरेवाईट झाले तर आम्ही कुणाला विचारायचे?'
गणेश देशमुख - अमरावती
तपोवनला पालकत्त्व देण्यात आलेल्या अंबाचे वास्तव्य एका शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आहे. 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन' कायद्यांतर्गत अंबाची संपूर्ण जबाबदारी बालगृहाकडे असावी, असे अपेक्षित आहे. आता अंबाची जबाबदारी नेमकी कुणाची हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे.
अंबा ही तपोवनात वास्तव्यास गेल्यानंतर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील काही बालगृहांमध्ये तिचे स्थानांतरण करण्यात आले होते. अंबाला नागपूरच्या बालगृहात स्थानांतरित करण्यात आल्यानंतर तेथून तिला पुन्हा अमरावतीला पाठविण्यात आले. अमरावतीला स्थानांतरित करताना तिचा प्रवेश येथील एका महाविद्यालयात करण्यात आला. हल्ली अंबा त्याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात वास्तव्याला आहे.
अंबाचे पालकत्त्व तपोवन संस्थेकडेच असल्यामुळे 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट'अंतर्गत अंबाच्या सुरक्षित आणि नियमसंगत पालनपोषणाची जबाबदारी तपोवनातील कनिष्ठ आणि वरिष्ठ बालगृहाच्याच शिरावर आहे. जबाबदारी निभवायची तर अंबाचे वास्तव्य बालगृहात नाही. वास्तव्य महाविद्यालयात असले तरी ते 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट'ला बाध्य नाहीत. अशा स्थितीत सदर कायद्याची अंमलबजावणी अचूकपणे कशी होणार? ती कोण करणार, असा क्लिष्ट गुंता निर्माण झाला आहे.
तपोवनचे शिफारसपत्र
संबंधित महाविद्यालयाच्या जबाबदार अधिकाऱ्याशी या प्रवेशाच्या अनुषंगाने संपर्क केला असता, विदर्भ महारोगी संस्थेचे आणि पालकमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे शिफारसपत्र प्रवेशाच्यावेळी देण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रवेश नियमबाह्य
अंबाचा प्रवेश त्या महाविद्यालयात करणे हे नियमबाह्य असल्याची तक्रार तिच्या मातापित्याची आहे. गैरकायद्याची मंडळी आमच्या मुलीची विक्री करण्याचा घाट घालून बसलेली आहे. त्यांच्या दहशतीमुळे ती आमच्याविरुद्ध बोलण्यासही बाध्य होते. अशा स्थितीत महाविद्यालयातून तिचे काही झाले तर आम्ही जाब विचारायचा कुणाला? मुलगी शोधायची कुठे, असे नाना प्रश्न त्यांनी उपस्थित केले.