बकरीचोरांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:01:13+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारमध्ये कोंबल्या.

बकरीचोरांना रंगेहाथ पकडले
धारणी : मध्यप्रदेशातील गुडी गावातील दोन बकऱ्या कारमध्ये चोरून नेत असलेल्या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. धारणी मार्गे परतवाडाकडे जात असताना हरिसाल येथे ग्रामस्थांनी त्या चोरांना कारसह पकडले.
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारमध्ये कोंबल्या. पळून जात असताना शेखपुरा येथील कलीमभाई यांना ते आढळून आले. त्यांनी धारणी येथील पोलीस सचिन होले यांना माहिती दिली. आरोपी देडतलाईहून धारणी येथे पोहोचले. तेथे पोलिस कर्मचारी सचिन होले यांनी तौसीफ कुरेशी, पप्पू पेंटर यांच्या मदतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांच्या अंगावर कार नेऊन तेथून पळ काढला. पोलीस कर्मचारी सचिन होले यांनी सहायक उपनिरीक्षक सुभाष सावरकर यांना हरिसाल गावाजवळ वनविभागाच्या गेटवर नाकाबंदी करून आरोपीला रोखण्याची सूचना दिली. आरोपी तेथे पोहचले; परंतु गेट बंद असल्याने त्यांनी तेथून कार मागे घेऊन हरिसाल गावाजवळच्या सिपना नदीच्या पुलाजवळ असलेल्या कच्च्या रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. कार उभी करून आरोपीने जंगलाच्या मार्गाने पळ काढला. त्यावेळी हरिसाल येथील गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांचेविरूद्ध गुन्हा नोंदविला.