दिवाळीत गावी जा, आरामात ४० विशेष बसची केली सोय
By जितेंद्र दखने | Updated: November 7, 2023 19:11 IST2023-11-07T19:11:34+5:302023-11-07T19:11:44+5:30
२० दिवस प्रवाशांच्या खिशावर १० टक्के दरवाढीचा बोजा

दिवाळीत गावी जा, आरामात ४० विशेष बसची केली सोय
जितेंद्र दखने
अमरावती : दिवाळीच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने प्रवासभाडे दहा टक्क्यांनी वाढविण्याचे निश्चित केले आहे. या काळात प्रवाशांची संख्या वाढणार असून पुणे, संभाजीनगर, जालना, अहमदनगर या शहरांसाठी ४० तर जिल्हातंर्गत शहरांसाठी विशेष बस धावणार आहेत. या विशेष फेऱ्या ६ नोव्हेंबरपासून धावू लागल्या आहेत. तर बुधवार ८ नोव्हेंबर वीस दिवसांकरिता दरवाढ करण्यात येणार आहे. विशेष बसची सोय केली असली तरी प्रवाशांच्या खिशावर बोजा पडणार आहे.
गर्दीच्या कालावधीत राज्य परिवहन प्राधिकरणास ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता आहे. त्यानुसार दिवाळी हंगामात प्रवासी तिकीटदरात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. साधी व जलद या दोन्ही बससाठी प्रतिटप्पा ९ रुपये ६० पैशांनी (प्रवास तिकीट) आकारणी होईल. तसेच वातानुकूलित साधी, शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही १३ रुपयाने आकारले जाणार आहेत.
महिला प्रवाशांची गर्दी
महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलतीमुळे या वर्षी प्रथमच दिवाळीकाळात महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. भाऊबीज व दिवाळीला माहेरी जाण्यासाठी एसटीचा पर्याय असल्याने महिलांचा खर्च वाचणार आहे. पेक्षा अधिक वय ७५ असणाऱ्या वयस्कर प्रवाशांनाही मोफत बससेवेचा लाभ देण्यात येतो. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रवासी अधिक राहणार असल्याचे दिसते.
दिवाळीच्या काळात सर्वांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी महामंडळ तयारीला लागले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या विभागातील काही बसेस दिवाळीकाळात विशेष बस म्हणून धावणार आहेत. - अभय बिहुरे विभागीय वाहतूक अधिकारी,