‘धोंडी धोंडी पाणी दे, पीक पाणी होऊ दे’

By Admin | Updated: July 8, 2015 00:42 IST2015-07-08T00:42:44+5:302015-07-08T00:42:44+5:30

गतवर्षीच्या भीषण दुष्काळाची झळ सोशित असताना शेतकऱ्यांनी या हंगामाच्या पेरणीसाठी कशीबशी आर्थिक तरतूद केली.

'Give the stone a bucket and give it water' | ‘धोंडी धोंडी पाणी दे, पीक पाणी होऊ दे’

‘धोंडी धोंडी पाणी दे, पीक पाणी होऊ दे’

पावसाची दडी : दुष्काळाचे सावट, दोन्ही नक्षत्रांत पाऊस बेपत्ताच
भंडारा : गतवर्षीच्या भीषण दुष्काळाची झळ सोशित असताना शेतकऱ्यांनी या हंगामाच्या पेरणीसाठी कशीबशी आर्थिक तरतूद केली. घरात असले नसले ते बियाणे खते मातीत पेरले. आणि मागील १३ दिवसांपासून पावसाची दडी व उन्हाळ्याची प्रचिती यावी अशी कडक उन्ह तापत असल्याने पेरणी केलेल्या बियाण्यांच्या अंकुराची दयनीय गत झाली असल्याने ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी वरुणराजाची करुणा भाकत शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहे.
एक वर्षीचा दुष्काळामध्ये शेतकऱ्याला पुढील पाच वषे आर्थिक संकटाच्या खाईत लोटते. घरातील आजारपण कुटुंबातील मुला-मुलींचे शिक्षण व लग्नसमारंभ व बँकेच्या कर्जाचा सातबारा वरील बोझा हे सारे प्रश्न त्याच्या मनाला सुन्न करुन टाकतात. जून महिन्यात पावसाने जोमात हजेरी लावली. १७ ते २२ जूनपर्यंत सतत झालेला पाऊस पाहता शेतातील पेरण्या खोळंबल्या होत्या. २३ जूननंतर मात्र पावसाने कायमचीच दडी मारली. या कालावधीत केवळ एक टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली.
काही शेतकऱ्यांची सुरुवातीच्या धडाक्याच्या पावसाने केलेली पेरणी निघाली नाही. ती दडपली होती, त्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली आणि आता तर पावसाच्या खंडामुळे दुपारदरम्यान तापणाऱ्या कडक उन्हात जमिनीतून निघालेल्या कोवळ्या अंकुराची केविलवाणी स्थिती झाली आहे. त्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे. त्यांनी तुषार संचाद्वारे पाणी देणे सुरु केले. पण ओलिताची सोय असलेले असे अत्यल्प कास्तकार आहेत.
कोरडवाहू शेती व निसर्गाच्या लहरीपणावर शेतकऱ्यांचा प्रपंच धोक्यात आला. शेतकरी दुष्काळाच्या दुष्ट चक्रार सापडला आहे. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या मानगुटीवर भारनियमनाचे भूत बसले असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. कोरडवाहू शेती, त्यात १३ दिवसांपासून पावसाची दडी, कडक उन्हाने जमिनीतून निघणारे केविलवाणे पिकाचे अंकुर हेसुध्दा हेसुध्दा ग्रामीण भागातील शेतीचे विदारक व मन हेलावून सोडणारे चित्र आहे. सध्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागले आहे. ( शहर प्रतिनिधी)

पावसाचा खेळखंडोबा, दुबार पेरणीचे संकट
आमगाव (दिघोरी) : पंधरवाड्यापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील धान उत्पादकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असून अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे करपले आहेत. मृगाच्या पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामाला जोमाने लागला होता. मोठ्या लगबगीने त्याने धान रोवणीसाठी पऱ्हे घातले. मात्र पऱ्हे जगविण्यालायक पाऊस न पडत असल्याने शेतकऱ्याला चिंता सतावू लागली आहे. मागील वर्षी सुद्धा शेतकऱ्याला दुबार तिबार पेरणी करावी लागली होती. त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यावर्षी सुद्धा तिच स्थिती निर्माण होत आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत असला तरी शेतकरी परंपरागत शेती करण्याकडे कल असतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी दरवर्षी नागवला जात असून आज शेती शाश्वत शेती राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.

सुरुवातीच्या दमदार पावसाने शेतात पऱ्हे टाकण्यात आले. मात्र, पावसाने दडी मारल्याने पऱ्हे करपू लागली आहे. यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाईल.
-चन्नेश्वर भोंगाडे,
शेतकरी.

शेतात धान पीक घेण्यात येते. रोवणीच्या तयारीसाठी पऱ्हे टाकण्यात आले. यासाठी हजारो रूपये खर्च आला. पण पावसाने दडी मारल्याने पऱ्ह्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे सर्वच जण हतबल झाले आहे.
- हुसैन पराते,
शेतकरी

पीक पेरणीसाठी रासायनिक खतांची खरेदी करण्यात आली. यासाठी हजारो रुपये खर्च आला. पण पावसाअभावी पऱ्हे व पेरलेले बियाणे निघालेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार. त्यासाठी पुन्हा जमीन तयार करणे व बियाणे व खर्च वेगळाच, अशी आमची गत होत आहे.
- वामन देशमुख, शेतकरी

Web Title: 'Give the stone a bucket and give it water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.