जिनिंग, प्रेसिंग मालकांना नुकसान भरपाईसाठी नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:39 IST2021-01-08T04:39:07+5:302021-01-08T04:39:07+5:30
मुख्यमंत्र्यांना निवेदन : दोन दिवस संपाचा कॉटन जिनर्स असोसिएशनचा इशारा अमरावती : ‘गतवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान झाले ...

जिनिंग, प्रेसिंग मालकांना नुकसान भरपाईसाठी नोटिसा
मुख्यमंत्र्यांना निवेदन : दोन दिवस संपाचा कॉटन जिनर्स असोसिएशनचा इशारा
अमरावती : ‘गतवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई द्या,’ अशा नोटिसा पणन महासंघाने पाठविल्याने जिनिंग-प्रेसिंग कारखानाधारकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. या नोटिसा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी ११ व १२ जानेवारी रोजी संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनने अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
कॉटन जिनर्स असोसिएशनच्या निवेदनानुसार दरवर्षी राज्यात एप्रिल महिन्यात जिनिंग, प्रेसिंग उद्योगातील कापूस खरेदी बंद केली जाते. मात्र कोरोना संकटामुळे जिनिंग प्रेसिंग कारखाने मार्च २०२० मध्ये पूर्णत: बंद झाले होते. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनामुळे मे २०२० च्या पहिल्या आठवड्यात जिनिंग प्रेसिंग सुरू करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशाने व राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑगस्ट २०२० पर्यंत जिनिंग-प्रेसिंग सुरू होते. ताडपत्री टाकून कापूृस, सरकीच्या गाठीचे संरक्षण केले होते. मात्र फेडरेशनने विहित मुदतीत गाठी सरकीची विल्हेवाट केली नाही. दरम्यानच्या काळात अतिवृष्टीमुळे कापूस गाठी सरकी खराब होऊन प्रतवारीचा दर्जा खालावला. यात कोणत्याही जिनिंग प्रेसिंग कारखानाधारांना मोठ्या रकमेच्या नोटिसा पाठविल्या आहेत. ११ व १२ जानेवारी असे दोन दिवस जिनिंग प्रेसिंगधारक संप पुकारणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २५ जानेवारीपासून खरेदी बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पणन महासंघाचे अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनचे प्रवीण भुजाडे, अनिल पनपालिया, उमेश भुतडा, आशिष राठी, सुधाकर भारसाकळे, अनंत चव्हाण, सोलव, हरिसेठ अग्रवाल, शैलेश देशमुख, मयूर जैन, आदींनी दिला आहे.
बॉक्स
उद्योग अडचणीत
मागील हंगामात कोविड १९ मुळे जिनिंग प्रेसिंग उद्योजकांनी शेतकऱ्यांना आणि शासनाला सहकार्य करून अतिवृष्टी, वादळ अशा परिस्थितीत कापूस खरेदी केली. यावेळी दरवर्षी मशिनरीची दुरुस्तीसाठी कामे असतात; परंतु ती न झाल्यामुळे मशिनरीचे मोठे नुसान झाले आहे. त्यातच फेडरेशनकडून या उद्योजकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मागील देयके बाकी असूनसुद्धा काही जिनिंग उद्योजकांसोबत पुढील करार केले आहेत. त्यामुळे जिनिंग उद्योग अडचणीत आल्याचे जिनिंग प्रेसिंग मालक प्रवीण भुजाडे यांनी सांगितले.