कर्ज पुनर्गठन, पीक कर्जाबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी
By Admin | Updated: May 31, 2015 00:13 IST2015-05-31T00:13:01+5:302015-05-31T00:13:01+5:30
कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज, पीक विमा याबाबतची माहिती सोप्या शब्दात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त.....

कर्ज पुनर्गठन, पीक कर्जाबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी
बैठक : जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना
अमरावती : कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज, पीक विमा याबाबतची माहिती सोप्या शब्दात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज व पीक विम्याचा लाभ मिळेल, या दृष्टीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.बी. खोरगडे, वित्तीय साक्षरता प्रमुख एच. एम. चौबे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे जिल्हा समन्वयक एस.के. सिंह, स्टेट बँक आॅफ हैदराबादचे फिल्ड आॅफिसर सुधीर कुमार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य अधिकारी दीपक अलोणे, अलाहाबाद बँकेच्या जिल्हा समन्वयक रश्मी डोंगरे उपस्थित होते.
अमरावती हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. गतवर्षी कर्जवाटप उद्दिष्टाच्या ६८ टक्के कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यात कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज, पीक विमा आदींची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सहकार विभाग, कृषी विभाग, बँक तसेच पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी तालुकास्तरावर किमान पाच मेळावे आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या. यावर्षी खरीप हंगामात १ हजार ६९५ कोटी ४४ लाख इतके कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, शेतकऱ्यांकडून कमितकमी कागदपत्रे घेऊन त्याला कर्ज द्यावे, १५ जूनपूर्वी कर्जाचे पुनर्गठन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत ज्या बँकांचे अधिकारी उपस्थित नव्हते, त्यांना खुलासा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यापुढे १० जुलैपर्यंत पीक कर्जाबाबत नियमित बैठका होणार असून त्यासाठी संबंधित बँक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)