गॅस कटरने तोडले एटीएम; आठ मिनिटात १६.४५ लाख लंपास
By प्रदीप भाकरे | Updated: May 12, 2023 17:27 IST2023-05-12T17:27:30+5:302023-05-12T17:27:55+5:30
Amravati News स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने तोडून तब्बल १६ लाख ४५ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले.

गॅस कटरने तोडले एटीएम; आठ मिनिटात १६.४५ लाख लंपास
अमरावती: स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने तोडून तब्बल १६ लाख ४५ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले. चोरांचे एटीएममध्ये येणे व कटरने कापून रोख लांबविणे, हा सर्व प्रकार केवळ आठ मिनिटांमधील आहे. त्यामुळे ते चोरटे ‘वेल ट्रेन्ड’ आणि शार्प असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गुरूवारी पहाटे २.५५ ते ३.०३ या कालावधीत ही धाडसी चोरी झाली. चोरीचा संपुर्ण घटनाक्रम सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
याप्रकरणी एटीएम कंपनीचे चॅनेल मॅनेजर पवन भोकरे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी १२ मे रोजी सकाळी १०.१२ च्या सुमारास अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला. माहिती मिळताच वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अमरावतीहून जरूडला पोहोचले. श्वानपथक व ठसेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान, एटीएमच्या ज्या सीसीटिव्हीमध्ये संपुर्ण घटनाक्रम कैद झाला, ते संपुर्ण फुटेज जप्त करण्यात आले आहे. सायबर शाखेची मदत घेऊन चोरांचे चेहरे उघड करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. चोर ज्या चारचाकीने आले, त्याच चारचाकीत ते ५०० व १०० रुपयांची रोकड असलेला स्ट्रे लांबविताना दिसत आहे.
असा आहे घटनाक्रम
गुरुवारी रात्री लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने चोर जरूडच्या एसबीआयच्या एटीएमपर्यंत आले. त्या गाडीचा क्रमांक टीओ ४२३ एचपी २५२० असा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. १२ मे रोजी पहाटे २.५६ मिनिटांनी एक आरोपी एटीएममध्ये स्प्रे मारताना दिसतो. तर, २.५७ ला दुसरा चोर आत येतो. त्याचवेळी एटीएममधील सायरन वाचतो. त्यामुळे एकाची धांदल उडते. त्यामुळे स्प्रे मारणारा एटीएमच्या बाहेर जाऊन दारात बसतो. शटर अर्धे खाली आणतो. त्यानंतर काही सेकंदात एटीएम गॅस कटरने तोडली जाते. त्याचा आवाज व आगीच्या चिंगाऱ्या स्पष्ट दिसतात. त्यानंतर आरोपी त्यातील संपुर्ण रक्कम घेऊन पसार होतात.
पोलीस अधीक्षकांची भेट
हे चोरटे अत्यंत प्रशिक्षित आणि सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी एटीएमची आधी रेकी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, सीआयडी आयकार्ड युनिट, एलसीबीचे निरिक्षक तपन कोल्हे, अक्षय रेवडकर, राजेन्द गुहे आदींनी भेट दिली. वरूड पोलिसांसह एलसीबी तपास करीत आहेत.
आंतर राज्यीय टोळी असल्याचा संशय
ते गुन्हेगार अत्यंत सराईत असल्याने आणि सोबतच गाडीच्या डिक्कीत गॅस कटर आणि सिलेंडर घेवून अवघ्या आठ मिनिटात १६ लाख रुपये लंपास करून पसार झाल्याने ती टोळी आंतरराज्यीय असावी, समोर एखादा कंटेनर उभा करून घटनेत वापरलेले चारचाकी वाहन कंटेनरमध्ये लपवून पसार झाले असावेत, असा कयास बांधला जात आहे.