गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट

By Admin | Updated: October 27, 2015 00:10 IST2015-10-27T00:10:40+5:302015-10-27T00:10:40+5:30

शहर तथा जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक एलपीजी गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट सुरू आहे.

Gas customers 'sneaky' loot | गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट

गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट

महिन्याला ५० लाखांची वसुली : सिलिंडर मोजून देण्यास नकार
लोकमत विशेष
प्रदीप भाकरे अमरावती
अमरावती : शहर तथा जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक एलपीजी गॅस ग्राहकांची ‘गुपचूप’ लूट सुरू आहे. ‘डिलिव्हरी चार्जेस’च्या नावावर लाखो ग्राहकांकडून ‘डिलिव्हरी मॅन’ ‘डिलिव्हरी चार्ज’च्या नावाखाली प्रत्येकी १० ते २० रुपये उकळत आहे. महिन्याकाठी ही रक्कम ५० लाखांच्या घरात जाते.
जिल्ह्यात हिंदूस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कार्पोरेशनकडून एलपीजी (घरगुती) गॅसचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक वितरक आहेत. वितरकांकडे गॅसची मागणी केल्यानंतर उपलब्धतेनुसार ग्राहकांना एजन्सीने नेमलेल्या ‘डिलिव्हरी मॅन’मार्फत घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविले जाते. उल्लेखनीय म्हणजे वितरकांकडून दिल्या जाणाऱ्या एकूण रकमेच्या पावतीमध्ये ‘डिलिव्हरी चार्ज’चा अंतर्भाव असतो. पावतीवर असलेली रक्कम घेऊन गॅस सिलिंडर देणे बंधनकारक असताना प्रत्येक ग्राहकाकडून अतिरिक्त १० ते २० रुपये उकळले जातात. महिन्याकाठी ४ लाख ग्राहकांकडून १० ते १२ रूपये याप्रमाणे हिशेब केल्यास सरासरी ही रक्कम ५० लाखांवर जाते.

सिलिंडरमध्ये गॅस कमी
घरी येणारे गॅस सिलिंडर वजन करून घेतल्यानंतरच स्वीकारा. अन्यथा त्यात दोन ते तीन किलो गॅस कमी राहू शकतो. राहुलनगर, बिच्छू टेकडी येथील ग्राहकांची अशी फसवणूक झाली होती. उल्लेखनीय म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या कार्यकाळात पुरवठा विभागाने नवाथे परिसरात सिलिंडरचे ‘रि-रिफिलींग’ करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा उघड केला होता. पुन्हा त्या गोरखधंद्याने उचल खाल्ली आहे.

का होते लुबाडणूक?
दर महिन्याला ‘डिलिव्हरी बॉय’कडून १० ते २० रुपये अतिरिक्त घेतले जातात. मज्जाव केल्यास घरपोच सेवा बंद होण्याची भीती ग्राहकांना वाटते. ‘डिलिव्हरी बॉय’कडे वजन काटा असतो हे अनेकांना माहिती नाही. बडनेऱ्यात तर अनेकदा यावरून वादसुध्दा उद्भवले आहेत.

अशी होते गॅसची चोरी...
ग्राहकांपर्यंत प्रत्यक्षात गॅस सिलिंडर पोहोचण्यापूर्वी सिलिंडरचे सील पूर्ण न तोडता टाचणी किंवा बारीक सुईच्या साहाय्याने त्याचे पॅकिंग सैल केले जाते. त्यानंतर ते झाकणासह बाहेर काढले जाते. त्यातील गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जातो. अशारितीने गैरप्रकार झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत हे सिलिंडर पोहचते तेव्हा त्यात अडीच ते तीन किलो गॅस कमी झालेला असतो.

गॅस १४ किलो २०० ग्रॅम
भरलेल्या घरगुती सिलिंडरचे वजन साधारणत: ३१ किलो २०० ग्रॅम असते. त्यात १४ किलो २०० ग्रॅम इतका गॅस असतो. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सिलिंडर घेताना वजन करुन घेणे आवश्यक आहे. रिकाम्या गॅस सिलिंडरचे वजन कमी अधिक होऊ शकते.

Web Title: Gas customers 'sneaky' loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.