आयुक्तांच्या दालनासमोर आणून टाकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:01 IST2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:01:04+5:30
प्रभाग ९ मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढ्यात दिलेल्या माहितीनुसार, वडाळी, महादेव खोरी भागात अस्वच्छता पसरली असून, नाल्यांची साफसफाई होत नाही, यासंदर्भात स्वच्छता अधिकारी सीमा नैताम यांना त्यांनी पत्र दिले होते. मात्र, पत्रानंतरही प्रभागात कचरा संकलनासाठी कटला येत नाही.

आयुक्तांच्या दालनासमोर आणून टाकला कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी- एसआरपीएफ प्रभाग क्रमांक ९ च्या भाजपच्या नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी प्रभागातील सफाई, कचऱ्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर कचरा आणून टाकला. या आंदोलनामुळे प्रशासनाची दमछाक झाली. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकालाच आंदोलन करण्याची वेळ आल्याची चर्चा जोरदार रंगली.
प्रभाग ९ मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढ्यात दिलेल्या माहितीनुसार, वडाळी, महादेव खोरी भागात अस्वच्छता पसरली असून, नाल्यांची साफसफाई होत नाही, यासंदर्भात स्वच्छता अधिकारी सीमा नैताम यांना त्यांनी पत्र दिले होते. मात्र, पत्रानंतरही प्रभागात कचरा संकलनासाठी कटला येत नाही. नाल्या तुंबल्या आहेत. स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदार तक्रारीनंतरही समस्या सोडवित नाही, असे गाºहाणे त्यांनी मांडले. गल्लीबोळात कचरा साठला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे संबंधित कंत्राटदारांचे दुर्लक्ष आहे. डास निर्मूलन फवारणी नाही. प्रभागातील नागरिक त्रस्त असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रभागातील कचरा कटल्याद्वारे महापालिकेत आणून टाकावा लागल्याचे चव्हाण म्हणाल्या.
दरम्यान, आयुक्त रोडे यांनी स्वच्छता अधिकारी नैताम यांना दालनात बोलावून घेतले. त्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी सांगितले. स्वत: या प्रभागात भेट देण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. यावेळी पंचफुला चव्हाण, राजेश खोडस्कर, संजय चव्हाण, भय्या देशमुख, निशा चव्हाण, लता आखे आदी उपस्थित होते.