राजापेठमध्ये पुन्हा गॅंगवाॅर, खून का बदला खून सें!
By प्रदीप भाकरे | Updated: August 22, 2024 13:35 IST2024-08-22T13:31:30+5:302024-08-22T13:35:19+5:30
गुन्हेगार तरूणाचे अपहरण करून खून : मृतदेह फेकला नालीत, दोघे अटकेत

Gangwar again in Rajapeth, "murder ka badla murder se"!
प्रदीप भाकरे
अमरावती: केडिया नगरस्थित उद्यानासमोर गॅंगवॉरमधून झालेल्या खुनाच्या घटनेची शाई वाळते न वाळतेच पुन्हा एकदा गॅंगवॉरमधून एका गुन्हेगार तरूणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास सातुर्णा ते साईनगर रोडवरील चांडक नाश्टा सेंटर भागात तो खुनी थरार घडला. यश रोडगे (२१, मराठा कॉलनी, गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांना गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास यश रोडगे याचा मृतदेह भातकुली नाका परिसरातील कचरा डेपोच्या रोडच्या बाजुला असलेल्या नालीत आढळून आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबियांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
याप्रकरणी, मृताचा मित्र तथा घटनेत जखमी झालेल्या आकाश रामटेके (२१, गोपालनगर) याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी काटे, श्रेयस आवटे, तक्षदिप इंगळे, मंथन पाडनकर, दिपक ठाकुर व अन्य दोन तीन जणांविरूध्द गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण व आर्मॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी यश रोडगेवर तलवार व चाकुने हल्ला करत त्याला दुचाकीवर बसवून शहराबाहेर नेले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी उशिरा रात्री त्याचा मृतदेह नालीत फेकून देण्यात आला. तो शोधण्यासाठी राजापेठ पोलीस,गुन्हे शाखा व विशेष पथक चार ते पाच तास कार्यरत होते. अखेर रात्री तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची व आरोपी अटक करण्याची कार्यवाही करण्यात आली.
‘लावा’च्या खुनाची पाश्वभूमि
६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री गोपालनगर टी पॉईटजवळून अंकुश मेश्राम उर्फ लावा (२२, म्हाडा कॉलनी) याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. ८ सप्टेंबर रोजी रात्री कोंडेश्वर जंगल भागात लावाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी राजापेठ पोलिसांनी सनी प्रधान याच्यासह पाच ते सहा अल्पवयीनांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. लावाच्या खूनात यश रोडगेचा सहभाग असल्याचा आरोप करत बुधवारी रात्री लावाप्रमाणेच यश रोडगेचे अपहरण करण्यात आले. त्याचा मृतदेह शहराबाहेर नेऊन टाकण्यात आला.