शेतमजुर तरूणीवर सामुहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी
By प्रदीप भाकरे | Updated: December 7, 2022 20:56 IST2022-12-07T20:55:46+5:302022-12-07T20:56:09+5:30
धक्क्यातून सावरत ७ डिसेंबर रोजी दुपारी तिने मोर्शी पोलीस ठाणे गाठले.

शेतमजुर तरूणीवर सामुहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी
अमरावती: एका २२ वर्षीय संत्रातोड मजुर तरूणीवर दोघांनी सामुहिक अत्याचार केला. ६ डिसेंबर रोजी रात्री १२ ते ४ दरम्यान ती धक्कादायक घटना घडली. मोर्शी तालुक्यातील दापोरीस्थित पाक नदी धरणासमोरील जंगलामध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी सुरदास भोजराज इडपाची (४०, दापोरी) व देवा मुन्ना उईके (३०, रा. हिवरखेड) या दोघांविरूध्द अपहरण, सामुहिक अत्याचार, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी सुरदास इडपाची व देवा मुन्ना उईके हे दोघे ६ डिसेंबर रोजी रात्री पिडित तरूणीच्या घरी आले. आम्ही हिला संत्रा तोडीच्या कामावर घेऊन जातो, अशी बतावणी त्यांनी तरूणीच्या आ्ईकडे केली. तिच्या आईने परवानगी दिल्याने दोन्ही आरोपी तिला दुचाकीवर पाक नदी प्रकल्प धरण समोरील जंगलामध्ये घेऊन गेले. तेथे दोन्ही आरोपींनी तिच्यावर जबरीने अत्याचार केला.
दुष्कृत्य केल्यानंतर घरी परत आणून देत असताना आरोपींनी तिला प्रकरणाची वाच्यता केल्यास जिवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली. तिला तिच्या घरासमोर आणताच दुचाकीवरून धक्का देण्यात आला. त्यामुळे पिडिताच्या हाताला व पायाला खरचटले. त्या धक्क्यातून सावरत ७ डिसेंबर रोजी दुपारी तिने मोर्शी पोलीस ठाणे गाठले.