टूर पॅकेजच्या नावाने गंडा, आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:50+5:302021-06-18T04:09:50+5:30
अमरावती : टूर पॅकेजच्या नावाने २ लाख २२ हजार रुपयांनी एका स्थानिक कंपनीच्या संचालकाची फसवणूक करणाऱ्या पुणे येथील ...

टूर पॅकेजच्या नावाने गंडा, आरोपीस अटक
अमरावती : टूर पॅकेजच्या नावाने २ लाख २२ हजार रुपयांनी एका स्थानिक कंपनीच्या संचालकाची फसवणूक करणाऱ्या पुणे येथील एका युवकास फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी अटक करून त्याला अमरावतीत आणले.
अनिकेत नितीन दामले (रा. येरवडा, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. परीक्षित अरुण भांबूरकर (३३, रा. बियाणी चौक) यांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंदविली होती. अरुण भांबूरकर यांचे ‘परीक्षित बायोटेक’ नामक खत कंपनी आहे. एक वर्षांपासून गुगलवर ‘आर्या हॉलिडेज’चा संचालक अनिकेतशी त्यांची ओळख झाली. त्याने अनेकदा अरुण भांबूरकर यांना ‘सोशल मीडिया’वर अनेक प्रकारच्या टूर पॅकेजची माहिती दिली होती. त्यानंतर २ जानेवारी २०२१ रोजी अनिकेतने एका मोबाईलवरून कॉल करून पुन्हा टूर पॅकेजची माहिती दिली. त्यानुसार भांबूरकर यांनी त्या टूर पॅकेजमध्ये कंपनीच्या १५ ग्राहकांना गोव्याला पाठविण्याचा करार केला. प्रत्येकी १४ हजार ८०० रुपये दर निश्चित झाले. त्यानुसार २ लाख २२ हजार रुपये एवढी रक्कम भांबूरकर यांनी अनिकेतच्या बँक खात्यात पाठविली. ही रक्कम चार टप्प्यांत दिली गेली. त्यानंतर १५ जानेवारी रोजी गोव्याला जाण्याकरिता एका एअरोप्लेनचे तिकीट कन्फर्मेशन व हॉटेलचे बूकिंग नियमानुसार देण्यात आले नाही. म्हणून भांबूरकर यानी विचारणा केली असता, त्यांना आरोपीने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र त्यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फ्रेजरपुरा ठाण्यात धाव घेतली व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आता आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.