भावी शिक्षक कॉपीबहाद्दर
By Admin | Updated: June 16, 2014 23:15 IST2014-06-16T23:15:24+5:302014-06-16T23:15:24+5:30
पिढी घडविण्याची जबाबदारी उराशी बाळगून शिक्षक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या डी.एड. च्या विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची सीमा ओलांडली आहे. कोणताही अभ्यास न करता केवळ कॉप्या करून शिक्षकी पदवी

भावी शिक्षक कॉपीबहाद्दर
डी.एड. परीक्षेत गैरप्रकार : गर्ल्स हायस्कूलमध्ये कॉपींचा खच
गणेश वासनिक - अमरावती
पिढी घडविण्याची जबाबदारी उराशी बाळगून शिक्षक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या डी.एड. च्या विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची सीमा ओलांडली आहे. कोणताही अभ्यास न करता केवळ कॉप्या करून शिक्षकी पदवी मिळविण्यात भावी शिक्षक धन्यता मानत असल्याचे चित्र येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये सोमवारी अनुभवता आले.
डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा ८ जूनपासून येथील शासकीय गर्ल्स हायस्कुलमध्ये सुरू आहे. या परीक्षेत भावी शिक्षक केवळ कॉप्या करीत असून या केंद्रावर गैरप्रकार होत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्या अनुषंगाने या केंद्रावर फेरफटका मारला असता गर्ल्स हायस्कूलच्या पाचही वर्गखोल्यांमध्ये भावी शिक्षक कॉपी करण्यात मग्न असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर केंद्रावरील पर्यवेक्षकसुध्दा या भावी शिक्षकांना कॉप्या करण्यात हातभार लावत होते. केंद्राच्या बाहेरील बाजूस खिडक्यांलगत कॉपींचा असलेला खच बघितला तर तो डोळे दीपवून टाकणारा होता. डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा मराठी भाषेचा पेपर होता. २२० विद्यार्थ्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांकडे गाईड आणि नोट्स असल्याचे वास्तव अनुभवता आले. पर्यवेक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. या केंद्राच्या बाहेर सर्व काही ‘आॅलवेल’ आहे, असे चित्र मुख्याध्यापकांनी रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्राच्या आत भावी शिक्षक हे केवळ कॉप्या करून पदवी कशी मिळेल, याच मनसुब्यात होते. ही परीक्षा जुने डी.एड. अभ्यासक्रमाच्या मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली आहे. यात काही अप्रशिक्षित शिक्षकांचाही समावेश आहे. एस.टी. संवर्गातील विद्यार्थी मात्र ज्यांचे डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही त्या विद्यार्थ्यांचाही या परीक्षेत सहभाग आहे. कॉप्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.