२०० गावांतील स्मशानभूमीसाठी 'डीपीसी'तून मिळणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:38 IST2025-08-06T17:37:49+5:302025-08-06T17:38:33+5:30

Amravati : पालकमंत्र्यांकडून दखल; झेडपीचा पुढाकार, ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव

Funds will be provided from 'DPC' for crematoriums in 200 villages | २०० गावांतील स्मशानभूमीसाठी 'डीपीसी'तून मिळणार निधी

Funds will be provided from 'DPC' for crematoriums in 200 villages

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
ज्या गावांत स्मशानभूमी नाही, अशा गावात सोयीसुविधांयुक्त स्मशानभूमी साकारली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २०० गावांत स्मशानभूमी निर्माण करण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता ग्रामपंचायतीकडून नव्याने प्रस्ताव मागविले आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीत महापात्र यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.


अमरावती जिल्ह्यात सुमारे ७०० अशी गावे आहेत, जिथे अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीला शेड उपलब्ध नाही. या मुद्द्यावर 'लोकमत' वृत्तपत्राने ४ जुलैला '७०० गावांमध्ये स्मशान शेडची व्यवस्था नाही' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून याविषयी वास्तव जाणून घेण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्मशान शेड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मशान शेडसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी निर्णय घेतला आहे. 


ग्रामपंचायतींवर प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी
ज्या गावांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे, त्या ग्रामपंचायतींना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी प्रस्ताव तयार करून त्या जागेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्यांच्याकडून तातडीने पूर्ण केली जावी. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जागा नाही, त्यांच्यासाठी जागेचा प्रस्ताव तयार करावा. आणि ज्या गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता नाही, अशा गावातील नागरिकांनी पालकमंत्री कार्यालयात स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी निधीसाठी निवेदन देऊ शकतात, असे पालकमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


स्मशानभूमीपर्यंत ७६० गावांमध्ये रस्ता नाही
अमरावती जिल्ह्यात सुमारे ७०० गावांत जिथे अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमी शेड नाही. ३३१ गावांमध्ये स्मशान शेडसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, ३६९ गावांमध्ये जागाच उपलब्ध नाही. ७६० गावांमध्ये स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता नाही. या गावांमध्ये जर कोणाच्या मृत्यूचा प्रसंग आला, तर शेतीत, नदी-नाल्याच्या काठी अंतिमसंस्कार करावा लागतो. जिल्हा परिषद प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात सुमारे २०० गावांमध्ये स्मशानभूमी शेड तयार केले जाणार आहे.


"गावांमध्ये स्मशानभूमी शेड तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ग्रामपंचायतींकडून नव्याने प्रस्ताव मागविले.
पहिल्या टप्प्यात २०० गावांत शेड होणार आहे."
- संजीता महापात्र, सीईओ, अमरावती


 

Web Title: Funds will be provided from 'DPC' for crematoriums in 200 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.