गजभियेच्या मागावर पोलिसांची चार पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:44 IST2018-03-20T00:44:01+5:302018-03-20T00:44:01+5:30
सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमानखां पठाणला अटक करण्यासाठी गाडगेनगरसह गुन्हे शाखेची चार पथके कामी लागली आहेत.

गजभियेच्या मागावर पोलिसांची चार पथके
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमानखां पठाणला अटक करण्यासाठी गाडगेनगरसह गुन्हे शाखेची चार पथके कामी लागली आहेत.
पोलिसांनी इर्विन चौक ते कॅम्प मार्गावरील काही प्रतिष्ठानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीसुद्धा केली. मात्र, अद्याप दोन्ही आरोपींचा पोलिसांना सुगावा लागला नाही. मात्र, लवकरच दोन्ही आरोपींना अटक केली जाणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
शीतल पाटील यांचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळल्यानंतर नातेवाइकांनी सुनील गजभियेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येचा आरोप केला.
इर्विन चौकातील सीसीटीव्ही शो-पीस
घटनेचे गांभीर्य बघता, गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ दखल घेत तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी सुनिल गजभिये, रहमानखां पठाण तसेच अन्य चार जणांविरुद्ध खुन व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविला. या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शीतल पाटील व सुनील गजभिये यांना १३ मार्च रोजी इर्विन चौकात एकत्र पाहिल्याचे नातेवाईक सांगत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी सोमवारी इर्विन चौक ते कॅम्प मार्गावरील विविध व्यापारी प्रतिष्ठानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपींच्या शोधासाठी गाडगेनगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांची प्रत्येकी दोन पथके तयार करण्यात आली असून, ते विविध दिशेने आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या एका पथकाची गजभियेच्या घरावर पाळत आहे, तर एक पथक बाहेरगावातील नातेवाइकांच्या घरी शोध घेत आहेत.
पोलिसांनी इर्विन चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते सीसीटीव्ही कॅमेरा शो-पीस असल्याचे आढळून आले आहे. ते डेमो स्वरूपात लागले असून, त्यांचे चित्रीकरण स्टोअर झाले नसल्याचे आढळून आले आहे. कॅम्प रोड स्थित डी-मार्टमध्ये सुनील गजभिये दृष्टीस पडल्याचे एका नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तेथील सीसीटीव्हीची पाहणीसुद्धा केली.