३१ डिसेंबर मुद्रांक शुल्क भरल्यास नोंदणीला चार महिन्यांची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:07+5:302020-12-27T04:10:07+5:30
अमरावती : दस्त निष्पादन करून ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांपर्यंत दस्तांची नोंदणी करता येईल. त्यामुळे ...

३१ डिसेंबर मुद्रांक शुल्क भरल्यास नोंदणीला चार महिन्यांची सवलत
अमरावती : दस्त निष्पादन करून ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांपर्यंत दस्तांची नोंदणी करता येईल. त्यामुळे पक्षकारांनी गर्दी करू नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी डी. एस. भोसले यांनी केले आहे.
शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत दस्त नोंदणी केल्यास तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलत घोषित केलेली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा निबंधक कार्यालयात सुरू आहे. सहदुय्यम निबंधक कार्यालय- अमरावती शहर, अमरावती ग्रामीण व अचलपूर, तसेच दुय्यम निबंधक दुय्यम निबंधक कार्यालय- भातकुली, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, वरूड, धारणी ही कार्यालये सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहतील.
जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्त नोंदणी चालू राहील. मुद्रांक शुल्कात ३१ डिसेंबरपर्यंत सवलत देण्यात आली असल्याने सध्या निबंधक कार्यालयांत पक्षकारांची गर्दी होत आहे. तथापि, पक्षकारांनी योग्य त्या मुद्रांक शुल्काचे चलन ३१ डिसेंबरपूर्वी काढून ठेवले असल्यास व दस्त ३१ डिसेंबरपूर्वी निष्पादन (दस्तावर स्वाक्षरी) केल्यास दस्ताची नोंदणी पुढील चार महिने म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत याच दराने करता येईल. त्यामुळे नागरिकांनी एकाचवेळी गर्दी न करता ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा व दस्त निष्पादित करावे. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये दिलेल्या सवलतीचा लाभ सर्वसामान्य घरे व घरे विकत घेणाऱ्यांना मिळेल, अशी माहिती डी. एस. भोसले यांनी दिली.