प्रचलित निकषानेच मदत : १९८६ गावांमधील ७ लाख हेक्टरपेक्षा अधिक खरीप क्षेत्र बाधितगजानन मोहोड - अमरावतीमागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आहे. १९८६ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकरी कुटुंबांचे ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टरमधील खरिप पिके पावसाअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. दरवर्षीच्या दुष्काळाच्या मालिकेने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर जगावे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे कोलमडलेल्या जिरायती व बागायती, अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांना, बागाईतदारांना सावरण्यासाठी तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. यावर्षी जिल्ह्यातील १४ ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्यामुळे शासनाने आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना प्रचलित निकषांसोबत आर्थिक मदत देण्याची गरज आहे. गेल्या वर्षी खरिप हंगामात सरासरीपेक्षा १५० टक्के अधिक पाऊस, परतीचा पाऊस यामुळे खरिपाचा हंगाम गारद होऊन सरासरी ५० ते७० टक्क्यांनी उत्पादन घटले. जून महिन्यापासून पावसाने दीड महिना दडी मारली. त्यामुळे खरिपाची पेरणी २ महिने उशिरा झाली. परिणामी सोयाबीनला वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर, शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाची दडी यामुळे ृसरासरी उत्पन्न ७० ते ८० टक्क्यांनी घटले. त्यानंतर सगळी मदार रबीवर असताना जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभऱ्याची उगवण देखील ५० टक्क्यावर आली. आता तर पेरणीचा कालावधी आटोपला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ८६ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. ही एकूण पेरणी क्षेत्राच्या ५८ टक्के आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत. आर्थिक विवंचनेतून जिल्ह्यात या वर्षात १०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी १६ शेतकरी आत्महत्या एकट्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आहेत. एकूणच शेतकऱ्यांची स्थिती विदारक असल्याचे दिसते. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ठोस उपाय व्हायला हवेत. (प्रतिनिधी)
साडेचार लाख शेतकरी दुष्काळग्रस्त
By admin | Updated: December 8, 2014 22:27 IST