उपचारासाठी रेफर केलेल्या चाळीस दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:59+5:302021-08-27T04:17:59+5:30
दोन डॉक्टरांसह दहा कर्मचारी सामूहिक रजेवर, चुरणी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार फोटो कॅप्शन - जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले रुग्णांशी ...

उपचारासाठी रेफर केलेल्या चाळीस दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू
दोन डॉक्टरांसह दहा कर्मचारी सामूहिक रजेवर, चुरणी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
फोटो कॅप्शन - जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले रुग्णांशी चर्चा करताना व दवाखान्याच्या बाहेर एक फोटो)
चिखलदरा : ४० दिवसांच्या चिमुकलीला न्यूमोनिया व हगवण लागल्याने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु, परतवाडानजीक बहिरमजवळ ुबुधवारी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. अन्य एका घटनेत चुरणी ग्रामीण रुग्णालयातील या बालमृत्यूला जबाबदार परिचारिकेचे निलंबन झाल्यानंतर गावकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना धमक्या आल्याचे सांगत दोन डॉक्टरांसह दहा कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकली. आरोग्य यंत्रणेतील चालले तरी काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने मेळघाटात एकाही कुपोषित बालकाचा मृत्यू होऊ नये, असे आदेश दिले असतानाच वादग्रस्त ठरलेल्या चुरणी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत तब्बल दहा जणांमी विविध कारणांचा दाखला देत सामूहिक रजा टाकली आहे. कंत्राटी कर्मचारी व इतर प्रतिनियुक्तीवरील डॉक्टरांच्या भरवशावर दोन दिवसांपासून येथील आरोग्य सेवा सुरू आहे. येथे अंजली अजय अखंडे (रा बुटीदा) यांना प्रसूतीकरिता रुग्णालयात दाखल केले. त्यांची १८ ऑगस्ट रोजी प्रसूती झाली. २० ऑगस्ट रोजी रात्री बाळाची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टर व परिचारिका आले नाही. अखेर ते बाळ दगावले. या प्रकरणात परिचारिकेला निलंबित करण्यात आले असले तरी डॉक्टरांवरसुद्धा कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल येवले यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकाऱ्यांक़डे एका निवेदनाद्वारे केली आहे.
-------------
बालमृत्यू, मातामृत्यूसुद्धा
१६ ऑगस्ट रोजी चुरणी येथे मातामृत्यू झाला. मेहरीआम येथील एका बालकाचासुद्धा येथील डॉक्टर व परिचारिकेच्या चुकीमुळे मृत्यु झालेला आहे. अशा डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
बॉक्स
डॉक्टर वर्षापासून बेपत्ता
चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. वर्मा व डॉ. श्रीकांत सावरकर हे रुजू झाल्यावर एक वर्षापासून रुग्णालयात दिसलेच नाहीत. ते जिल्हा शल्यचिकित्सकांशी संगनमत करून व देवाणघेवाणीतून सतत गैरहजर राहत असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद सदस्य पूजा येवले व राहुल येवले यांनी तक्रारीतून केला आहे.
बॉक्स
वाटेतच दगावले ४० दिवसांचे बाळ
कोयलारी येथील देविका मंगेश कासदेकर या ४० दिवसांच्या चिमुकलीला न्यूमोनिया व हगवण लागल्याने काटपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु, तेथेही वेळेवर योग्य उपचार व्यवस्था नसल्याने अचलपूर पाणी जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी रेफर केले. परंतु बहिराम नजीकच ाा चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला.
कोट
चिमुकलीला काटकुंभ आरोग्य केंद्रातून पाठवण्यात आले होते. गंभीर आजारी असल्याने तपासणी व उपचार करून तत्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. विविध कारणांनी दोन डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज देऊन गेले. त्यांच्या रजेचा काहीच परिणाम नाही.
- साहेबलाल धुर्वे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चुरणी
कोट
जीव वाचवण्याऐवजी जीव घेणारे रुग्णालय ठरल्याने सामूहिक रजेसह बुटीदा येथील चिमुकल्याच्या दवाखान्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कारवाईची तक्रार करण्यात आली आहे. कोयलारी येथे ४० दिवसांच्या चिमुकलीचा रस्त्यात मृत्यू झाल्याने त्याच्याही चौकशीची मागणी केली.
- पूजा राहुल येवले, जिल्हा परिषद सदस्य