माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा भाजपला रामराम, शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:49+5:302021-06-18T04:09:49+5:30
फोटो -१७एएमपीएच०१ अमरावती : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतला ...

माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा भाजपला रामराम, शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश
फोटो -१७एएमपीएच०१
अमरावती : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते १९ जून रोजी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील. हा प्रदेश भाजपला मोठा झटका मानला जात आहे. अमरावती महापालिकेत डॉ. देशमुख समर्थक भाजपचे २२ नगरसेवक असल्याची राजकीय सूत्रांची माहिती आहे. स्थानिक राजकारणावरून त्यांच्या मनात पक्षश्रेष्ठींविरुद्ध प्रचंड नाराजी होती, हे आता भाजप साेडण्याच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.
मुंबई येथे टिळक भवनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस अविनाश पांडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. डॉ. सुनील देशमुख यांना २००९ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे अमरावती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्ये देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमरावती मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर ते आमदार झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा डॉ. देशमुख हे काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. डॉ. देशमुख यांच्या प्रवेशाने अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटी येईल, असे सध्याचे चित्र आहे.
-------------
नाना पटोलेंसोबत स्नेहभोज अन् काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले हे अमरावती जिल्ह्याच्या १२ जून रोजी दौऱ्यावर होते. पटोले यांनी काँग्रेस बळकटीकरणाचा चंग बांधला आहे. काँग्रेसपासून दुरावले असो वा भाजपत नाराज असलेले नेते, पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षात प्रवेश ते देत आहेत. त्याअनुषंगाने अमरावतीत १२ जून रोजी नाना पटोले आणि डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्या एका जुन्या मित्राकडे स्नेहभोज घेतला आणि याच ठिकाणी डॉ. देशमुखांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
------------------
प्रदेश भाजपला मोठा धक्का
डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय भाजपसाठी राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे. विशेषत: अमरावती महानगरात भाजपची पोकळी भरून काढण्यासाठी जनतेतील चेहरा तूर्तास भाजपकडे नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. डॉ. सुनील देशमुख यांच्यासोबत नगरसेवक, पदाधिकारीदेखील लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. डॉ. देशमुख हे भाजपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय होते, अशी विश्वसनीय माहिती आहे.
--------------
कोट
माझी विचारधारा ही काँग्रेसची आहे. राजकारण जेव्हा कळायला लागले तेव्हापासून काँग्रेसमध्येच आहे. २००९ मध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले. असो, ‘देर आये दुरुस्त आये’. पुन्हा आपल्या घरी परत जात आहे.
- डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री