‘समृद्धी’वर १२ लाख झाडे लावण्याचा विसर, तीन वर्षांनंतरही महामार्ग ओस
By गणेश वासनिक | Updated: July 7, 2025 13:27 IST2025-07-07T13:26:09+5:302025-07-07T13:27:02+5:30
Amravati : महामार्गावर ३० लाख झाडे लावण्याचा दावा ठोकला जात असला, तरी प्रवासादरम्यान हा दावा फोल

Forgot to plant 1.2 million trees on 'Samriddhi', highways are still wet even after three years
अमरावती : राज्याच्या विकासाला गती देणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत १२ लाख झाडे लावण्याचा विसर पडला आहे. तीन वर्षे लोटली असताना पहिल्या टप्प्यात तीन लाख वृक्षांची लागवड झालेली नाही. परिणामी, ‘समृद्धी’वर हिरवळ निर्माण होऊ शकली नाही. या महामार्गावर वारंवार होणारे अपघात हेसुद्धा महामार्गाच्या दोन्ही बाजू ओस पडल्याचे महत्त्वपूर्ण कारण मानले जात आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावरून ७०१ किमीचा प्रवास मात्र सुसाट झालेला आहे. हा महामार्ग तयार करताना वन्यजीवांसह इतर बाबींची काळजी घेण्यात आली आहे. महामार्गावर ३० लाख झाडे लावण्याचा दावा ठोकला जात असला, तरी प्रवासादरम्यान हा दावा फोल ठरतो. ‘समृद्धी’वर डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यासाठी बरीच जागा असताना त्याठिकाणी फुलझाडे, शोभिवंत झुडपे लावून महामार्गाची ‘समृद्धी’ झाली, असा अर्थ प्रशासनाने काढला की काय? असा सवाल आता प्रवासी उपस्थित करत आहेत.
१२ लाख झाडांचे काय?
१) समृद्धी महामार्गावर दोन्ही लेनच्या मधोमध ९ मीटर एवढी जागा झाडे लावण्यासाठी राखीव आहे.
२) वड, पिंपळ, कडूनिंब, आंबा अशी महत्त्वाची ऑक्सिजन खेचणारी झाडे ३ मीटर अंतरावर लावली तर ३३३ प्रति किमी याप्रमाणे ४.६६ लाख झाडे लावता येतील. दुप्पट लाइनमध्ये हा आकडा ९ लाख झाडांवर पोहोचतो. याशिवाय डिव्हायडरच्या मधोमध ३ लाख झाडे लावता येतील.
३) गत तीन वर्षांत समृद्धीवर १२ लाख झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र, ३ वर्षांनंतरही या महामार्गावर २ लाख झाडेही व्यवस्थित लावली गेली नाहीत. गुलमोहर, काशीद यासारखी कच्च्या लाकूड प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत.
काही भागात नैसर्गिक हिरवळ
इगतपुरी ते कसारा हा ७६ किमीचा समृद्धी महामार्ग नैसर्गिक हिरवळीने नटलेला आहे. या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी जागा आहे. मात्र, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने जंगल असल्याने प्रवास सुखद होतो. मात्र, इतरत्र प्रवास हा भकास वाटतो.
"समृद्धी महामार्गावर पॅकेजनिहाय वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यात काही शोभिवंत, फुलझाडे लावली आहेत. टप्प्याटप्प्याने झाडे लावली जातील."
- गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, नागपूर