आणखी एकावर फौजदारी

By Admin | Updated: May 20, 2015 00:55 IST2015-05-20T00:55:02+5:302015-05-20T00:55:02+5:30

दोन दिवसांच्या अवकाशानंतर अमरावतीत दाखल होताच चंद्रकांत गुडेवारांनी आणखी एका कर्मचाऱ्यावर फौजदारी...

Foreclosure on one more | आणखी एकावर फौजदारी

आणखी एकावर फौजदारी

आयुक्तांचे आदेश : चौघांना कारणे दाखवा नोटीस; कामात अनियमितता भोवली
अमरावती : दोन दिवसांच्या अवकाशानंतर अमरावतीत दाखल होताच चंद्रकांत गुडेवारांनी आणखी एका कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाईचे आदेश दिले. या कर्मचाऱ्यासहित एकूण चौघांना कारणे दाखवा नोटीशीही त्यांनी बजावल्यात. गुडेवारांच्या या ‘वारां’नी महापालिका प्रशासन कमालीचे अस्वस्थ झाले आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक मिलिंद शाह, सहायक संचालक नगररचना विभागातील अनुरेखक अतिक रहेमान, शिक्षण विभागातील चित्रा खोब्रागडे, कनिष्ठ लिपिक भारत वाघमोडे यांना सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून कारणे दाखवा नोटीशी बजावण्यात आल्या आहेत. वरिष्ठांनी वारंवार निर्देशित करूनही वेळेपूर्वी प्रशासकीय कामे न करणे, वरिष्ठांना व्यवस्थित माहिती न देणे, आदेशाचे पालन न करणे, अशा विविध कारणास्तव चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीशी बजावण्यात आल्या आहे. चारही कर्मचाऱ्यांना सात दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांकडे खुलासा सादर करावा लागणार आहे. अतिक रहेमान यांनी दहा महिन्यांपूर्वी भूखंड वाटपाप्रकरणी वरिष्ठांनी चर्चा करण्यासंदर्भात निर्देशित केले होते. संबंधित व्यक्तीकडून ६ लाख ३४ हजार रूपये भूखंडाची रक्कम जमा करणे आवश्यक होते. परंतु अतिक रहेमान यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता सदर फाईलसंबंधी चर्चा केली नाही. परिणामी हे प्रकरण प्रलंबित राहिले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मिलिंद शाह यांनी निवृत्त झाल्यानंतरही कपाटाच्या चाव्या प्रभारींना हस्तांतरित केल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. आयुक्तांनी या चारही जणांना नोटीशी बजावताना योग्यरित्या खुलासा प्राप्त झाला नाही तर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)

शिष्यवृत्ती वाटपात गौडबंगाल
येथील नेहरू मैदानस्थित मराठी मुलींच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती वाटपात गौडबंगाल झाल्याची बाब पुढे आली आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मिलिंद शाह यांनी २० हजार ५२६ रूपयांच्या शिष्यवृत्ती वाटपात गौडबंगाल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सेवानिवृत्ती झाल्यानंतरही कागदपत्रे सादर केली नाहीत, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम गहाळ झाल्याप्रकरणी त्यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

एकाची बडतर्फी, दुसऱ्याचे निलंबन?
महापालिका झोन क्र. ५ भाजीबाजार येथील कनिष्ठ लिपिक मंगेश नवले हे आॅगस्ट २०१४ पासून गैरहजर आहेत. त्यांच्या अफलातून कारभाराची माहिती आयुक्तांकडे सादर करण्यात आली. परिणामी मंगेश नवले यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून थेट घरी पाठवा, अशा सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिला. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिक्रमण विभागात सहाय्यक अभियंतापदी कार्यरत एम. डी. बल्लाळ हे सातत्याने वरिष्ठांचे फोन न उचलणे, कामात अनियमितता ठेवत असल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

Web Title: Foreclosure on one more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.