पळसफुले वेधत आहेत वाटसरूंचे लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:41+5:302021-03-17T04:14:41+5:30
पळसाच्या वृक्षाला फुलांचा बहर, निसर्गाच्या रंगोत्सवाला प्रारंभ अमरावती : मेळघाट परिसरातील डोंगरदऱ्यांवरच नव्हे, ग्रामीण भागातील शेतीच्या बांधावर बहरलेला पळस ...

पळसफुले वेधत आहेत वाटसरूंचे लक्ष !
पळसाच्या वृक्षाला फुलांचा बहर, निसर्गाच्या रंगोत्सवाला प्रारंभ
अमरावती : मेळघाट परिसरातील डोंगरदऱ्यांवरच नव्हे, ग्रामीण भागातील शेतीच्या बांधावर बहरलेला पळस वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी लाल, गुलाबी फुलांनी पळस नटला असून, मकरंद चाखण्यासाठी मधमाशा, पक्षी फुलांवर गर्दी करताना दिसत आहेत. औषध गुणधर्म असलेल्या पळसाच्या फुलांपासून तयार केलेल्या रंगाचा रंगपंचमीला प्रामुख्याने वापर होत असतो. मात्र, कृत्रिम रंगाच्या भडीमाराने आता ही प्रथा जवळजवळ बंद पडली आहे.
पळसाच्या पानांपासून द्रोण, पात्रवळी तयार करून त्यांचा लग्न समारंभात वापर होतो. परंतु, आता ती प्रथाही कालबाह्य होताना दिसत आहे. सध्या होळीचा सण व त्याला लागून असलेली रंगपंचमी ही आठवडाभरावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला सध्या आलेली ही फुले रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत.
बॉक्स
गडद केशरी रंग वेधतो लक्ष
सध्या जिल्ह्यातील अनेक भागात पळस वृक्षांची पानगळ झाली असली तरी या वृक्षावर आलेली पळसाचे गर्द केशरी फुलांनी बहरलेले वृक्ष अधिक मोहक दिसत असल्याने लक्ष वेधून घेत आहेत. रंगपंचमीसाठी या पळस फुलांपासून ग्रामीण भागात रंग तयार करून त्याचा वापर ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी केला जातो. शहरीकरणात हरविलेले ग्रामस्थ रस्त्याच्या कडेला उमललेली पळसफुले पाहून गावाच्या आठवणीने हळवे होतात.